महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरेत 'त्या' भिंतीमुळेच पूर? भिंत पाडण्याची पर्यावरणप्रेमींची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी - Aarey forest latest news

नदीचे पाणी अडवले गेल्याने जंगलात पाणी जाणार नाही. त्यामुळे झाडांना पाणी मिळणार नाही. अनेक झाडे नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

आरेतील संरक्षण भिंत
आरेतील संरक्षण भिंत

By

Published : Oct 21, 2020, 1:54 PM IST

मुंबई -पूर नियंत्रणासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीमुळेच आरेत पूर आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी ही भिंत त्वरित पाडण्याची मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुळात जंगलात पूर कसा येईल आणि जंगलात कसले पूरनियंत्रण आहे, असा प्रश्नही पर्यावरणप्रेमींना उपस्थित केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी आरेतील मिठीनदीच्या आणि ओशिवरा नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधली आहे. आरेतील पूर नियंत्रणासाठी ही भिंत बांधल्याचा दावा पालिकेने केला आहे. पर्यावरण आणि 'सेव्ह आरे' चळवळीतील आघाडीच्या वनशक्ती संघटनेने आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून संरक्षण भिंत पाडण्याची मागणी केली आहे. वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी संरक्षक भिंतीवर आक्षेप घेतला आहे. कोणताही विचार न करता मनात आले म्हणून काहीही करण्याला काय अर्थ आहे, अशा शब्दात त्यांनी पालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

जंगलात विविध मार्गाने येणाऱ्या पाण्यामुळे जंगलाचे निसर्गचक्र सुरळित सुरू राहते. अशावेळी मानवाने हस्तक्षेप करत नद्यांच्या बाजूलाच सिमेंटच्या भिंती उभारल्याने नक्कीच हे चक्र बदलणार आहे. त्याचा फटका जंगलाला बसणार आहे. हेच आरेतील संरक्षण भिंतीबाबत दिसत आहे. या संरक्षण भिंतीमुळे कधी नव्हे ते आरेतील काही भागात व तबेल्यात यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचले. त्यामुळे येथील काही तबेल्यात गुडघाभर पाणी होते. पालिकेच्या पूर नियंत्रण भिंतीमुळेच पूर आल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. नदीचे पाणी अडवले गेल्याने जंगलात पाणी जाणार नाही. त्यामुळे झाडांना पाणी मिळणार नाही. अनेक झाडे नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यामुळे भविष्यात संपूर्ण आरेत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांना व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ही भिंत त्वरित हटविण्यासाठी स्टॅलिन यांनी आदित्य ठाकरे यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. आदित्य ठाकरे हे संरक्षक भिंतीबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details