मुंबई -महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांनी दिली आहे. जयश्री पाटील यांनीच सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात कारवाई केली होती.
ईडीकडून लूकआऊट नोटीस -
१०० कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.
हे ही वाचा -खूशखबर! काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे ५ हजार तिकिटे शिल्लक
दरम्यान अनिल देशमुख यांच्या शोधासाठी 'ईडी'ने आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. 'ईडी'ची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. आता लूकआऊटमुळे लवकरच परराज्यातदेखील 'ईडी'कडून शोध सुरू होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.