मुंबई -देशात हिंदू आणि मुस्लीम यांचे डीएनए एकच असल्याचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विधान केले. गाझियाबाद येथे मुस्लीम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत मांडले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला. आता पाच राज्याच्या निवडणुका जवळ आल्याने आरएसएस सरड्यासारखे रंग बदलत आहे, लोकांनी सावध व्हावे, असे गंभीर वक्तव्य राऊत यांनी आज केले. तसेच शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे समर्थन केले.
'आरएसएस सरड्यासारखे रंग बदलते'
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऊर्जा मंत्री राऊत यांनी आरएसएसच्या सरसंघचालकांवर सडकून टीका केली. भागवत यांनी सर्व भारतीयांचे डीएनए एकत्र आहेत, असे विधान केले. मुसलमानांना मटणाच्या नावावर ठार मारण्यात आले. झुंडशाहीच्या प्रवृत्तीने अनेक लोकांचा जीव घेतला. त्यावेळी भागवत का बोलले नाहीत, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. आज उत्तरप्रदेश, गुजरात सारख्या पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्याने ते भाष्य करत आहेत. याचा अर्थ सरडा जसा रंग बदलतो तसा रंग आरएसएस बदलत आहे, असा आरोप नितीन राऊत यांनी करताना लोकांनी यापासून सावध व्हायला हवे, असे आवाहन केले.