मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक हिरेन मनसुख यांचा शुक्रवारी मृतदेह आढळून आला. त्यानंतर याचे पडसाद विधानसभेत ही उमटले आणि त्या ठिकाणी तपास अधिकारी सचिन वझे यांचे नाव चर्चेत आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या वझेच्या भूमिकेवरून गुंता वाढत चालला आहे, त्याच अनुषंगाने या प्रकरणाचा हा विशेष वृत्तांत..
अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या गाडीचा तपास वझेंकडे-
मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि निलंबित असलेले सचिन वझे 6 जून 2020 ला पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते. दरम्यान गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवलेली कार आढळून आली होती. त्या घटनेचा तपास पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्याकडे होता. मात्र चार दिवसांपूर्वी सचिन वाझे यांच्या कडून तो तपास काढून घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणातील गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला.
फडणवीसांनी वझेंवर विधानसभेत व्यक्त केला संशय़-
या सर्व प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी विधानसभेत गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर संशय व्यक्त करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, सचिन वझे यांना अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी त्याच्याकडून तपास काढून घेत दुसरी नेमणूक केली. त्यांना का बदललं? ज्या माणसाने स्कॉर्पिओ गाडी बंद पडल्याची तक्रार केली. तो माणूस ओलामध्ये बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला. मग तो तिथं कोणाला भेटला," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
सचिन वझे घटना स्थळी कसे पोहोचले?
तसेच त्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या होत्या. गाडी ओळखल्याबरोबर सचिन वझे पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचले. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला आहे. तसेच या गाड्या ठाण्यातील रहिवासी मनसुख हिरेन यांच्या आहेत. तपास अधिकारी वझे देखील ठाण्यातील आहेत. या दोघांचे अधिपासून संवाद होत आहेत. यामुळे या प्रकरणात शंकेला वाव असल्याचे मत विधानसभेत व्यक्त केले. त्यानंतर हिरेन यांचा मृतदेह आढळल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात काही तरी गौडबंगाल असल्याचे फडणवीस म्हणाले.
एनआयएकडे प्रकरण द्या-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझें विरोधात संशय व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर हे प्रकरण एनआयएकडे देण्याची मागणी केली आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायाकडे पुरावे देणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.