मुंबई- मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच, सोमवारी कुर्ला नेहरू नगर येथील इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. दरड व इमारत कोसळण्याच्या अशा घटना घडल्यास वेळीच मदत पोहचावी. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण दिले जात ( Emergency Management Training In Mumbai ) आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण -मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. ज्याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. अश्या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या कालावधी मध्ये नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे असे प्रशिक्षण दिल्यास नागरिकांचे मृत्यू रोखता येऊ शकतात. धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या इमारतीमधील आणि जवळील नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधल्यास त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.
१० हजार नागरिकांना प्रशिक्षण -नागरिकांना अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डॉक्टरांकडून आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण दिल्याने दरड कोसळल्यास त्याठिकाणी राहणारे नागरिक, अंथरुणाला खिळून असलेले नागरिक अशा लोकांना त्वरित मदत पोहचवून त्यांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे. अनिरुद्ध अकॅडमीची यासाठी पालिकेला मदत मिळत आहे. दरडी कोसळू शकतात ; अशा ठिकाणी १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ८ प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची नार्वेकर यांनी दिली.