मुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात न्यायालयीन कोठडीतल्या आरोपींना त्यांच्या कुटुंबियांसोबत तीन मिनिट फोनवरून बोलण्याची परवानगी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने दिली आहे. आज या प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे आणि इतरांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी ही परवानगी देण्यात आली. या प्रकरणावर पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
आरोप निश्चित करण्याचे निर्देश -मुंबई सत्र न्यायालयात आज एनआयए कोर्टाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला या प्रकरणात लवकरात लवकर पुरावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले. तसेच या प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले. यावर एनआयएने न्यायालयात असे सांगितले की या प्रकरणातील पुराव्याचे दस्तऐवज अधिक असल्यामुळे एकदम आणण्याकरिता वेळ जात आहे. तसेच हे सर्व पुरावे पुण्यात असल्याने थोडा वेळ लागत आहे, असे अधिकाऱ्यांनी आज विशेष न्यायालयात सांगितले आहे.
नेमके प्रकरण काय आहे - मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होते अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.
माओवादी संघटनांचा हात -या एल्गार परिषदेच्यामागे माओवादी संघटनांचा हात होता असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.