मुंबई - राज्यातील सुमारे ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले या निवडणुका येत्या २१ डिसेंबर रोजी होणार आहेत. तर या निवडणुकीची २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
कसा असेल निवडणुकांचा कार्यक्रम ?
राज्यातील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे वाजले बिगुल; 21 डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू
राज्यातील ३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायती आणि काही नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या २१ डिसेंबरला ही निवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त मदान यांनी केली.
राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि येत्या डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या १८ आणि नव्याने निर्मित केलेल्या ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येकी १७ सदस्यांसाठी मतदान होईल. त्यासाठी १ ते ७ डिसेंबर २०२१ या काळात नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबरला तर मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी आणि २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
कुठे होणार निवडणुका ?
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, पुणे- देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली, चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा, गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.
पोटनिवडणुकांसाठीही मतदान -
तर विविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. यात शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री, वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.