महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मित्र पक्षांनी " कमळ" चिन्हावर निवडणूक लढवावी, भाजपचा आग्रह - कमळ

मित्र पक्षांना आगामी लोकसभेत जागा देणार की नाही याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र जागा देण्याचा निर्णय झाल्यास कमळ चिन्हावरच निवडणूक लढवली जावी असा आग्रह भाजपकडून करण्यात येत आहे.

भाजप

By

Published : Mar 8, 2019, 2:33 AM IST

मुंबई - भाजपच्या मित्र पक्षांनी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरपीआय, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी संघटना हे भाजपचे मित्र पक्ष आहेत.

भाजप

लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती करताना भाजपाने विश्वासात घेतले नसल्याची खंत मित्र पक्षांनी व्यक्त केली होती. गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मित्र पक्षांच्या मतांचा भाजपला लाभ झाला होता. याचा कोणताही विचार न करता, भाजपने मित्र पक्षांना एकही जागेची घोषणा न करता युतीचा निर्णय घेतला असल्याने आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर मित्र पक्षांची बैठक ही झाली. या बैठकीत ४ मित्र पक्षांना ३ लोकसभेच्या जागा आणि विधानसभेत २५ जागा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीवर अद्याप भाजपने गांभीर्याने विचार केला नाही. मात्र जर मित्र पक्षांना जागा देण्यात आल्या तर त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा मत प्रवाह भाजपमध्ये आहे. कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास महादेव जानकर इच्छुक नाहीत,पण इतर पक्ष कमळ चिन्ह घेण्यास तयार होतील असा विश्वासही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने व्यक्त केला आहे.

याबाबत रासपचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांना विचारले असता, त्यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे, लवकरच याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. या शिवाय मित्र पक्षांबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे भाजपचे वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details