मुंबई- शिवसेना भाजप युतीची घोषणा तर झाली, पण कोण किती जागा लढणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा आल्या? त्याचा फॉर्म्युला अजूनही समोर आलेला नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना वाटत असलेली बंडखोरीची भीती. त्याची झलकही संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. जागा वाटपानंतर आता मोठ्या प्रमाणात आऊटगोईंगही होऊ शकते, याचीही भीती दोन्ही पक्षांना वाटते.
हेही वाचा - सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार.. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपच्या मतदारसंघावर शिवसेनेने तर शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे गुंतागुंत वाढली आहे. त्यात कोणता मतदारसंघ कोणाला हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गुलदस्त्यात ठेऊन इच्छुकांना गोंधळात टाकले आहे. पण, तरीही जी भीती आहे ती अजूनही टळलेली नाही.
हेही वाचा - मुख्यंमत्री फडणवीस यांना 'सर्वोच्च' झटका, प्रलंबित गुन्ह्यांची माहिती प्रकरणी खटला पुन्हा चालणार
अनेक जण बंडाच्या तयारीत?
वडाळा मतदारसंघ
मुंबईतील वडाळा मतदारसंघ हा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज झाल्या आहेत. आपली नाराजी दाखवण्यासाठी त्या मातोश्रीवरही धडकल्या होत्या. त्या या मतदारसंघात बंडाच्या तयारीत आहेत.
मागाठाणे मतदारसंघ
मुंबईच्या मागाठाणेची जागा शिवसेनेला गेली आहे. त्यामुळे येथून इच्छुक असलेले भाजपचे प्रविण दरेकर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. या नाराजीचा फटका शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंना बसू शकतो. सुर्वे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले असता त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावाचे झाले होते.
नवी मुंबई
नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली हे दोन्ही मतदासंघ भाजपला गेल्याने येथील स्थानिक नेतृत्व नाराज झाले आहे. नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते बेलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवाय बेलापूरच्या विद्यमान भाजप आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. जर इथे पक्षाने गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्यास इथेही पक्षांतर्गत बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे.