नवी दिल्ली - महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांबाबत चर्चा करण्यासाठी आज भारतीय निवडणूक आयोग महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा हे या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात राज्यपालांनी काल निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांना केली होती. त्यानंतर काल कोश्यारी यांनी निवडणूक जाहिर करण्याची विनंती केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करणार नसल्याचेच संकेत दिले असल्याचे मत व्यक्त होत आहे.