मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू झाली असून त्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यात शांततेने व पारदर्शकतेने निवडणूक पार पडण्यासाठी आमची तयारी झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. ते मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय आयोगाने भेटी देवून आढावा घेतला आहे. राज्यात सध्या ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार आहेत. यात पुरूष मतदार हे ४ कोटी ६४ लाख ३७ हजार ८४१ तर महिला मतदार हे ४ कोटी २७ लाख ५ हजार७७७ आणि तृतीय पंथियांची संख्या ही २ हजार ५९३ इतकी आहे. अजूनही मतदार नोंदणी सुरू असून शेवटच्या दिवशीपर्यंत नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नसल्याचे सिंह म्हणाले.
ईव्हीएमचा वापर याविषयी सर्व जिल्ह्यात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीची माहिती आम्ही देत आहोत. दिव्यांग मतदारासाठी विशेष प्रयत्न आम्ही कलेले आहेत. यावेळी अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा सर्व केंद्रावर उपलब्ध करून दिल्या जातील. मागील विधानसभा निवडणुकीत २००९ मध्ये ५० टक्के आणि २०१४ मध्ये ६०.३२ टक्के मतदान झाले हेाते. यावेळी ही टक्केवारी वाढावी यासाठी आम्ही अपेक्षा केली आहे. राज्यात मागील निवडणुकीत ९१ हजार ३२९ इतके मतदान केंद्रे होते. मात्र आता ९६ हजार ३४३ इतके मतदान केंद्र राहणार आहेत.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅडची उपलब्धता राज्याच्या गरजेप्रमाणे उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने आयटी ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. त्यासाठी लगेच दखल घेऊन कारवाई केली जाणार आहे. नवीन सुविधा आयटी ॲपलीकेशनचा फायदा सर्वाना घेता येणार आहे. १९५० हा हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे, यावर तक्रार नोंदविता येणार आहे. तर कायदा व सुव्यवस्थेची सर्व तयारी केलेली आहे. पुरेशा संख्येत केंद्रीय फोर्सेस आम्हाला उपलब्ध होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. बोगस मतदाराच्या संदर्भात आणखीही काही विषय आल्यास त्यावर कारवाई करू. काँग्रेसने त्यासाठी आमच्याकडे तक्रार दिली होती, त्यावर आम्ही त्यांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.