नवी दिल्ली - भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, या निवडणुका घेताना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात राज्यपालांनी काल निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांना केली होती. त्यानंतर काल कोश्यारी यांनी निवडणूक जाहिर करण्याची विनंती केली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आज सकाळी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये निवडणुकांना सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.