मुंबई - महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आपल्या पहिल्याच छोटेखानी मंत्रिमंडळापासून ते मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठाकरे सरकारचा फोकस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर असल्याचे दिसले. अगदी पहिल्या दिवसापासून बैठकांचे सत्र सुरू झाले. सातत्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी बैठका घेण्यात येतायेत, असे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंतचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधातील भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली गेली. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणि भाजपच्या नेत्यांकडून या कर्जमाफीवर सातत्याने टिप्पणी केली जात आहे. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांसाठी सरकार वेगळा विचार करत असल्याचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.