मुंबई -मुंबई महानगरपालिकेवर गेले २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील सत्ता शिवसेनेच्या ताब्यातून जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्ता गेल्यास त्याचा फटका शिवसेनेनला बसणार असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील ( Mumbai Municipal Corporation ) सत्ता जाऊ शकते, अशी शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. तर यावर शिवसेनेकडून ( BMC Shivsena Corporator ) बोलण्यास नकार देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर शिवसेना नगरसेवकांमध्ये खळबळ पाहायला मिळत आहे.
महापालिकेत शिवसेनेची सत्ता :मुंबई महानगरपालिकेचा ३९ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. यासाठी महापालिकेवर सर्वच पक्षांना आपली सत्ता असावी असे वाटते. मुंबई महानगरपालिकेवर तब्बल २५ वर्षाहून अधिक काळ सत्ता आहे. या कालावधीत भाजपा शिवसेनेचा मित्रपक्ष राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने वेगळी लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. पालिकेतील महापौर पद शिवसेनेकडे राहावे यासाठी मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. तसेच अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचे संख्याबळ ९७ इतके झाले होते. २०१७ मध्ये निवडणूक झालेल्या महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ ला संपला असल्याने पालिकेवर आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत २२७ प्रभाग होते. त्यात उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने ९ ची वाढ करून २३६ प्रभाग केले आहेत. सर्वाधिक नगरसेवक ज्या पक्षाचे असतील त्यांचा महापौर पालिकेवर बसणार असून त्या पक्षाची सत्ता पालिकेत येईल.
शिवसेना - भाजपा वाद :मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि मित्र पक्ष भाजपाची सत्ता होती. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर दोन्ही पक्षांनी २०१७ ची निवडणूक वेगळी लढवली होती. २०१७ च्या निवडणुकीच्या आधीपासून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला होता. गेले पाच वर्षे मुंबई महापालिकेत हा आक्रमक पवित्रा ठेवला होता. गेल्या याचा वर्षात पालिकेतील अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत भाजपाने पालिका मुख्यालयात, महापौर कार्यालयासमोर अनेक आंदोलने केली आहेत.