मुंबई -राज्यात पूरस्थिती आणि निसर्गाचा प्रकोप असताना शिंदे- फडणवीस ( Chief Minister Eknath Shinde ) सरकार मात्र सत्कार समारंभ व मंत्रिमंडळ विस्तार कशा पद्धतीने होईल, या राजकारणात व्यस्त असल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला भेटत आहे. एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार राज्यात स्थापन होऊन 20 दिवस झाले, तरी सुद्धा अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. ( Maharashtra Politics ) दुसरीकडे यांचे सत्काराचे जंगी कार्यक्रम राज्यभरात होत असताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना एका पाठोपाठ एक स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकार घेत आहे. यावरून शिंदे- फडणवीस सरकारवर ( Shinde- Fadnavis government )विरोधकांकडून टीका होत आहे.
राजकीय नाट्य अंतरानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 20 दिवस झाले असून अद्याप राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दुसरीकडे राज्यात पूरस्थिती व निसर्गाचा प्रकोप बघायला भेटत आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पावसाने थैमान घातले असून 2 मंत्र्यांचे हे सरकार राज्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तर दुसरीकडे या मंत्र्यांचे राज्यभर सत्कार सोहळे मोठ्या प्रमाणात सुरू असून तिथेही आवर्जून हजेरी लावताना हे नेते दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जंगी स्वागत -मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर हा स्वागत समारंभ असाच सुरू आहे. कधी शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, बंडखोर आमदार अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट यांनी सत्कार समारंभाचे विविध कार्यक्रम आयोजित केले. तर आता एकनाथ शिंदेबरोबर गेलेल्या 40 बंडखोर आमदारांनी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. राज्यात सध्या एक नाही, तर अनेक समस्या आवासून उभ्या असताना शिंदे -फडणवीस सरकार मात्र, यावर गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. मागच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.
पहिला झटका आरे कारशेडचा - शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-3 साठी आरे कारशेडला मंजुरी देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने मेट्रो- 3 कारशेडसाठी आरे ऐवजी कांजूरमार्गची जागा निवडली होती. परंतु शिंदे- फडणवीस सरकारने पुन्हा त्यावर स्थगिती देऊन, मेट्रो-3 कारशेड आरेमध्ये होईल असे सांगितले. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली जल आयुक्त शिवार योजना फडणवीस सरकारने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून - शिंदे फडणवीस सरकारने दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2018 मध्ये राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, राज्य 2019 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला होता. पण आता शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बदललेला निर्णय पुन्हा बदल करून आता नगराध्यक्ष व सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या बंदींना पेन्शन योजना जी महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. ती पुन्हा बंद केलेल्या तारखेपासून थकबाकी सहित सुरू करण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे.