मुंबई - वसईच्या राजवली वाघरळश पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde help ) यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि मनपा निधीतून हा निधी देण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
जखमींनाही 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देश-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेने हा खर्च करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
घटनास्थळी पोहोचले होते अग्नीशमन दल-वसई पूर्वेच्या वाघरळपाडा ( Vasai East Wagharalpada ) येथील एका चाळीतील घरावर सकाळी दरड कोसळल्याने (Pain collapse in Vasai) दोन जण ढिगार्याखाली अडकले होते. ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली आहे. या घरात अमित सिंग (४५) पत्नी आणि २ मुलांसह राहत होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पावसामुळे चाळीवर दरड कोसळली. स्थानिकांच्या मदतीने वंदना सिंग (४०) आणि ओमसिंग (१२) यांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान (NDRF) ची तुकडी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. अग्निशमन दलामार्फत बचाव कार्य करून चौघांना बाहेर काढण्यात आले. जवळच्या जिल्हा प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले.