मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. तेव्हापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी वर्षा बंगल्यावर प्रमुख बैठक पार पडली. यात एकनाथ शिंदेंकडून तीन प्रमुख आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी सूरतमध्ये जावून एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मात्र या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपासोबत सरकार स्थापन करा आणि मला उपमुख्यमंत्री पद द्या. अन्यथा तुमचे तुम्ही पहा, आमचे आम्ही पाहतो, असा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी शिवसेनाला दिला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद :मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी प्रथम चर्चा केली. त्यानंतर आपल्याच फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद करून दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे बरेच संतापले होते असे सूत्रांचे म्हणणे आहे. शिंदे यावेळी मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, एकीककडे मला गटनेतापदावरून काढल, का? आमदारांच्या अपहरणाचा आरोपही केला, त्याचवेळी चर्चाही करत आहात, असं का? असे एकनाथ शिंदेंनी सुनावल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळाले संकेत :देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनितीने राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही पाच उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला हादरा दिला. आघाडीची तब्बल 21 मते फुटली. शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मते फुटली. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 3 आणि घटक पक्षांची 9 अशी 12 मते फुटली. तर काँग्रेसचे देखील 3 आमदार फुटले. याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला त्याचवेळी महाविकास अघाडी आणि विशेषत: शिवसेनेत सर्वकाही अलबेल नाही हे स्पष्ट झाले होते.
संजय राऊतांच्या वागण्यावर आक्षेप :एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, संजय राऊत माझ्यासोबत बोलताना, फोनवर बोलताना खूप चांगले बोलतात. मग माध्यमांसमोर मात्र माझ्याविरोधात कसे काय बोलू शकतात. संजय राऊत यांच्या वागण्या बोलण्यावर शिंदे नाराज असल्याचे दिसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.