मुंबई - गुरुवारी, गणेश उत्सवाच्या ( Ganeshotsav ) दुसऱ्या दिवशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ( Deputy CM Devendra Fadnavis ) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी ( Famous industrialist Mukesh Ambani ) यांचे निवासस्थान अँटिलिया येथे पोहोचले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. सामान्य गणेशभक्तांप्रमाणेच मुकेश अंबानी यांनीही आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले. मुकेश अंबानींच्या घरातून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दुपारी 4.10 वाजता बाहेर पडले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही थेट एका उद्योगपतीच्या घरी गेल्याने पडद्याआड काही हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आता सुरू आहेत.
असे पहिलेच मुख्यमंत्री -यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई ( Political analyst Hemant Desai ) सांगतात की, "धीरूभाई अंबानी, अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांच्यापैकी कोणीही असो अंबानी यांच्या घरी वर्षानुवर्षे गणपती बसवला जात होता. पण, राज्यात कुठल्याही पक्षाचा सरकार असो कोणीही मुख्यमंत्री असो आत्तापर्यंत एकही मुख्यमंत्री या अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणपती निमित्त गेल्याचं मला आठवत नाही. एवढेच काय कुठल्याही उद्योगपतीच्या घरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेल्याच माझ्या पाहण्यात नाही. साधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उद्योगपती येतात." असं हेमंत देसाई यांनी सांगितले.
BMC च्या दृष्टीने महत्वाचे -पुढे हेमंत देसाई सांगतात की, "हे झालं आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांबद्दल. पण, आगामी मुंबई महानगरपालिकांच्या दृष्टीने देखील हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, आता भाजपला काहीही करून बृहन्मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता आणायची आहे आणि ज्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्वात मोठे बजेट असते. त्याचप्रमाणे पालिकेच्या अनेक अंतर्गत उपक्रमांमध्ये हे मोठे उद्योग समूह उद्योगपती जोडले गेलेले असतात. महानगरपालिकेतील अनेक काम या उद्योगपतींची जोडली गेलेली असतात. तसे अंबानी कुटुंबाचे संबंध सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांची चांगले आहेत. पण एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस ही जवळीक खूपच अग्रेसिव्हली दाखवून देतात."