मुंबई- एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची आज भेट झाली असून ही भेट केवळ पारिवारिक भेट असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. मात्र, तरीही रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न झाला असल्याच्या आरोपाचा खडसे यांनी पुनरुच्चार केला आहे. पंकजा मुंडे यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी बुधवारी एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली.
एकनाथ ख़डसे, ज्येष्ठ नेते, भाजप हेही वाचा -एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला, भाजपमध्ये नाराजी सत्र सुरूच
याभेटीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव झाला, त्याची कारणं काय आहेत? त्यावर चर्चा झाली. तसेच आगामी कालखंडात ज्या कारणांसाठी पराभव झाला ती वरिष्ठांपर्यंत कारणं पोहोचली पाहिजेत. वरिष्ठांनी याची नोंद घेऊन ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यावेळी खडसे यांनी केली.
सध्या पक्षावर मी नाराज नाही. आमच्या चर्चेदरम्यान ज्या नावांचा आम्ही उल्लेख केलाय ती नावं अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहेत. आता पाटील यांनी याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -'ओबीसी असल्याने भाजपकडून पंकजा मुंडेंचे खच्चीकरण'
अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र, नाराजी दूर करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. पक्षाने नाराजीची दखल घ्यावी. दुर्दैवाने हे चित्र खरं आहे. ओबीसी बहुजन नेते आहेत ते त्या ठिकाणी निवडणुकीत हरले. पंकजा मुंडे, रोहिणी खडसे, बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता असे अनेक नेते आहेत त्यांना तिकीट नाकारले गेलं तर, काही ठिकाणी त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न झाला हे अतिशय गंभीर असल्याचे खडसे यांनी सांगितले.
पक्षाचे 105 आमदार निवडून आले पण, काही कारवाया टाळल्या असत्या तर अधिक लोक निवडून आले असते
महायुतीला जनतेने मतदान केले होते ते फक्त भाजप आणि शिवसेना एकत्र होती म्हणून. दोन्ही पक्षात योग्य समन्वय साधला गेला असता तर, आज महायुतीचा मुख्यमंत्री झाला असता, अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सेनेची एखादी मागणी मान्य केली असती तर त्यातूनही मार्ग निघाला असता, असे सांगत खडसे यांचा रोष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वळला.
सरकार स्थापण होऊन अजून आठ दिवस झाले आहेत. सरकारच्या कामाबद्दल आता बोलणे बरे नाही, पुढच्या कालखंडात मूल्यमापन करता येईल, तसेच फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले आहेत व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असून त्यांचे अभिनंदन करतो, असेही खडसे म्हणाले.