मुंबई -राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचे पैसे दिले जात नाहीत, विमा योजना कंपन्यांकडून फसवले जात असल्याच्या अनेक तक्रारी राज्याच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत संबंधित कंपन्यांना ताकीद देऊन आतापर्यंत राज्यातील सुमारे 80 टक्के विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीचा परतावा देण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse On Crop Insurance ) यांनी दिली आहे.
Dada Bhuse On Crop Insurance : पिक विमा योजनेची ऐंशी टक्के रक्कम वाटप, जाणून घ्या...कुठे किती झाली वाटप? - DADA BHUSE latest news
शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचे पैसे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून येत असताना शेतकऱ्यांपर्यंत ८० टक्के रक्कम पोहोचल्याचा दावा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी ( Dada Bhuse On Crop Insurance ) केला आहे.
दादा भुसे
खरिपातील नुकसानीचा किती शेतकऱ्यांना परतावा?
- आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्यावतीने अहमदनगर, नाशिक, चंद्रपुर, सोलापूर, जळगाव आणि सातारा या सहा जिल्ह्यातील आठ लाख ७३ हजार ४०४ सहभागी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी १८४ कोटी रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यापैकी सुमारे १६३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
- इफको-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्यावतीने नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे पंधरा लाख ४३ हजार १०५ सहभागी शेतकऱ्यांनी पैकी नुकसान भरपाई निश्चिती झालेल्या शेतकऱ्यांना ५५९ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. यापैकी ४०३ कोटी रुपयांचं आतापर्यंत वाटप झाले आहे.
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्यावतीने परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार या दहा जिल्ह्यांमध्ये १७ लाख २२ हजार ६४७ सहभागी शेतकऱ्यांपैकी निश्चित नुकसान भरपाईचा आकडा ५२३ कोटी रुपये आहे. यापैकी ४४५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
- एचडीएफसी ईर्गो कंपनीच्यावतीने औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, धुळे, पुणे, अकोला या आठ जिल्ह्यांमध्ये १४ लाख ५६ हजार ९३८ सहभागी शेतकऱ्यांपैकी निश्चित नुकसान भरपाई २४८ कोटी रुपये करण्यात आली आहे. यापैकी २४० कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा दावा कृषी मंत्र्यांनी केला आहे.
- भारतीय कृषी विमा कंपनी तर्फे लातूर आणि बीड या जिल्ह्यांमधील २१ लाख ३६ हजार ६३९ सहभागी शेतकऱ्यांपैकी नुकसान भरपाईची रक्कम ८२६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापैकी चारशे दहा कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
- उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे आढळून आले असून बजाज अलायन्स कंपनीतर्फे सहभागी सहा लाख ६८ हजार ५४३ शेतकऱ्यांपैकी ४१३ कोटी रुपये नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे. यापैकी ३९९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
- राज्यातील सुमारे ८४ लाख १२७६ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. यापैकी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची निश्चिती करण्यात आली असून दोन हजार ७५६ कोटी रुपये देय आहेत. यापैकी दोन हजार साठ कोटी रुपयांचे वाटप झाल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच पीक विमा योजनेची नुकसान भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Dec 17, 2021, 5:18 PM IST