मुंबई - कोरोना संक्रमण राज्यभरात थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील 46 कारागृहांमध्येसुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे दिसून येत आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भावामुळे कारागृहात आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमण राज्यभरातील कारागृहांमध्ये पसरत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. या नंतर या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच पार पडलेली असून या समितीमध्ये राज्याचे गृह खात्याचे प्रधान सचिव आनंद लिमये, राज्याचे कारागृहाचे आईजी सुनील रामानंद व मुंबई उच्च न्यायालयाचे ए. के. सय्यद यांचा समावेश आहे.
राज्यातील कारागृहात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; 9 कैदी, तर 9 कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 7 मे रोजी या समितीची बैठक पार पडलेली असून या समितीच्या झालेल्या चर्चेत राज्यभरात असलेल्या कारागृहाची क्षमता व सद्यस्थितीत असलेल्या कैद्यांची माहिती या समितीद्वारे घेण्यात आली होती.
महाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 19 खुली कारागृहे, 1 खुली वसाहत आणि 172 दुय्यम कारागृहांचा समावेश होतो.
पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. पुणे व अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृह आहेत. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय पुण्यात असून राज्य प्रशिक्षण केंद्र पुण्यात येरवडा येथे आहे. कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करतो.
राज्यभरातील 46 कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता 23217 असताना आतापर्यंत 34896 कैद्यांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. कोरोना संक्रमणच्या दृष्टिकोनातून राज्यभरातील एकूण कारागृहात असलेल्या कैद्यांची संख्या, याबरोबरच कारागृहात पसरलेले कोरोना संक्रमण व त्यावर उपाय म्हणून करण्यात आलेल्या लसीकरणाचा बआढावा घेणारा ई टीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
पश्चिम कारागृह क्षेत्र
राज्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 2449 कैद्यांचे असताना या ठिकाणी 6880 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1699 असताना या ठिकाणी 2204 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.
मध्य कारागृह क्षेत्र
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 539 कैद्यांची असताना या ठिकाणी 1262 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या विभागातील परभणी जिल्हा कारागृहाची क्षमता 252 कैद्यांची असतानादेखील या ठिकाणी 360 कैदी ठेवण्यात आले आहेत.बीड जिल्हा कारागृहाठी हीच परिस्थिती आहे. या ठिकाणी क्षमता 161 कैद्यांची असताना या कारागृहात 288 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तसेच जळगाव जिल्हा कारागृहाची क्षमता 281 असताना या ठिकाणी 352 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.
दक्षिण कारागृह क्षेत्र
मुंबई मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 804 कैद्यांची असताना या ठिकाणी 2946 ठेवण्यात आले आहेत. तर, ठाणे मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1105 कैद्यांची असताना या ठिकाणी 3786 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तळोजा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 2124 कैद्यांची असताना या ठिकाणी 3251 कैदी ठेवण्यात आले आहेत. कल्याण जिल्हा कारागृहाचे क्षमता 540 कैद्यांची असताना या ठिकाणी 1889 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.
पूर्व कारागृह क्षेत्र-
नागपूर मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1810 कैद्यांची असताना या ठिकाणी 2404 कैदी ठेवण्यात आले आहेत , अमरावती मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 943 कैद्यांची असताना या ठिकाणी 1053 कैदै ठेवण्यात आलेले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्हा कारागृहाची क्षमता 331 कैद्यांची असताना या ठिकाणी 491 कैदी कारावास भोगत आहेत.
कोरोना संक्रमण पाहता कैद्यांना तात्पुरता जामीन
राज्यातील कारागृहामध्ये कोरोना संक्रमण पसरू नये म्हणून नेमण्यात आलेला हाय पावर कमिटीच्या 25 मार्च 2020 च्या सूचनेनुसार राज्यभरातील एकूण कारागृहातून 5105 कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार 8 मे 2020 रोजी 2464 कैद्यांना सोडण्यात आले होते. 11 मे 2020 च्या सूचनेनुसार 3019 कैद्यांना जामिनावर सोडण्यात आल्यानंतर आतापर्यंत राज्यभरातील 34896 कैद्यांपैकी 10788 कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आलेले आहे.
आत्तापर्यंत राज्यभरातील कारागृहात 18 जणांचा मृत्यू
राज्यभरातील एकूण कारागृहातील कोरोना संक्रमणाचा आढावा घ्यायचा म्हटलं तर आत्तापर्यंत राज्यभरातील कारागृहात 18 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 9 कैदी व 9 कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यभरातील कारागृहात एकूण 59583 कैद्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ज्यामध्ये 3287 कैदी हे कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. आत्तापर्यंत 3048 कैदी हे उपचाराने पूर्णपणे बरे झाले असून 230 कैदी अजूनही उपचार घेत आहेत.
राज्यभरातील कारागृहातील कारागृह कर्मचाऱ्यांची सुद्धा कोरोना चाचणी घेण्यात आली होती, यामध्ये आतापर्यंत 4012 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये 782 कारागृह कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी 663 कारागृह कर्मचारी उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले असून 110 कारागृह कर्मचारी अद्याप कोरोनाचे उपचार घेत आहेत.
कारागृहात करण्यात आले लसीकरण
राज्यातील कारागृहात 45 पेक्षा अधिक वय असलेले 6509 कैदी असून यामध्ये 4141 कच्चे कैदी असून 1668 शिक्षा झालेले कैदी आहेत. ज्यापैकी 1597 कच्च्या कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आली, तर 611 शिक्षा झालेल्या कैद्यांनाही कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 2208 कैद्यांना लसीकरण करण्यात आलेले आहे. राज्यातील 46 कारागृहात एकूण 3818 कारागृह कर्मचारी असून यापैकी 3165 कारागृह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.