मुंबई- पोटाची खळगी भागविण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून लोक आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत येतात. पण, राजधानीतही अन्नपाण्याविना कुपोषित बालके आढळून आली आहेत. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल आठ हजारांच्या आसपास मुंबईमध्ये कुपोषित बालके असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा, महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई काँग्रेसने मुंबईतील कुपोषित बालके दत्तक घेण्याचा संकल्प केला होता. त्यानिमित्त सर्व्हे केला असता विविध भागात सुमारे आठ हजार बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. त्यापैकी धारावी, मालवणी आणि मानखुर्द-गोवंडी या भागात कुपोषितांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. आजपर्यंत पालघर, ठाणे, नंदुरबार, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण मोठे असल्याचे आढळून येत होते. मात्र आदिवासी भागांनाही मागे काढील, अशी मुंबईतील विदारक अवस्था आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कुपोषित बालकांना दत्तक घेण्याचा संकल्प करून काँग्रेसने १,२२४ बालके दत्तक घेतली.
हेही वाचा-पीएफ खात्याकरिता UAN नंबर हवायं... फॉलो करा 'या' स्टेप्स
मुंबई काँग्रेसकडून सुदृढ बालकचा संकल्प
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्वतः ५००, तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ५०० कुपोषित बालके दत्तक घेतली. अशा पद्धतीने सव्वादोन हजार बालके काँग्रेसने दत्तक घेतली आहेत. राजीव गांधी यांच्या जयंतीदिनापासून या कुपोषित बालकांच्या पालनपोषणाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी ७७ केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. दर १० बालकांमागे १ सेविका त्यांच्या देखभालीसाठी व औषधोपचारासाठी नेमण्यात येणार आहे. `स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई`चा संकल्प अनेकजण करतात, पण मुंबई काँग्रेसने सुदृढ बालकचा संकल्प केला असल्याचे भाई जगताप यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-धर्मगुरुंविरोधात आक्षेपार्ह विधानाचा निषेध; समाजवादी पार्टीचे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन
केंद्राकडून लशींचा पुरेसा साठा मिळत नाही-भाई जगताप
राज्य सरकारने करोना लशींच्या दोन मात्रा घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे पास सुविधा दिली आहे. मात्र, अद्याप दैनंदिन प्रवासासाठी तिकीट दिले जात नाही. त्यामुळे सरकारने दोन मात्रा घेतलेल्या प्रवाशांना तिकीट सुविधा देण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे. मुंबईतील लसीकरण वेग अत्यल्प आहे. दुसरी मात्रा न मिळालेल्यांची संख्याही कमी आहे. केंद्राकडून लशींचा पुरेसा साठा मिळत नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला आहे. मुंबईत तीन दिवस लसीकरण होते, चार दिवस होत नाही. खासगीस्तरावर लशींचा मुबलक साठा आहे. ६८ लाख लसीकरणापैकी ६० टक्के खासगी आहे. दुसरी मात्रा न मिळलेल्यांची संख्या कमी आहे. १९ लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा-शेतकरी सन्मान योजनेत सावळा गोंधळ, तक्रारीनंतर साडेचार लाख शेतकरी अपात्र; विनयकुमार आवटे यांच्याशी ईटीव्ही भारत'ची बातचीत