मुंबई -रेल्वे सेवा, मालवाहतूक सेवा सुरू ठेवताना अनेक अनुचित प्रकार घडतात. मात्र, जीवाची बाजी लावून रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे अनुचित प्रकार रोखले आहेत. मध्य रेल्वेतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत प्रसंगावधान दाखविणाऱ्या आठ रेल्वे कर्मचाऱ्यांचा सुरक्षा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेच्या ८ कर्मचार्यांना कर्तव्यादरम्यानच्या सतर्कतेचे कौतुक म्हणून महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान केला.
या आठ जणांना मिळाला पुरस्कार
कर्जत, मुंबई विभागातील ट्रॅक मेंटेनर ऋषिकेश काळुराम पारणेकर व अनंता शंकर लोभी, सहायक लोको पायलट पुष्पेंद्र मीणा, सोलापूर विभागाचे शकिल जमादार, दादासाहेब महादेव शिंदे, लोको पायलट संजय चव्हाण, नागपूर विभागाचे वरिष्ठ गुड्स गार्ड प्रवीण कुमार प्रभाकर व भुसावळ विभागातील नगरदेवळा स्थानकाचे उप स्टेशन व्यवस्थापक सुजित कुमार या आठ जणांना पुरस्कार देण्यात आले.