मुंबई- 'तौत्के' चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सार्वजनिक वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या 109 बस गाड्यात बिघाड झाला होता. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे.
वाहतूक इतर मार्गाने वळवली
कोकण किनाऱ्यावर घोंघावणाऱ्या चक्रीवादळाने सोमवारी मुंबईत धडक दिली होती. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत काल जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. समुद्रात मोठ्या लाटांची निर्मिती झाली होती. तसेच साडेअकरानंतर वादळासह पावसाचा वेग वाढला होता. त्यामुळे दादर, सायन, हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल, माटुंगा, चेंबूर आदी सखल भागात पाणी तुंबले होते. रस्त्यावर पाणी, त्यात झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली होती. परिणामी बेस्टच्या बसेसची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. वादळी वाऱ्यांचा अंदाज घेऊन, बस वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. रस्त्यात पाणी साचल्याने अनेक बेस्ट उपक्रमाच्या 109 बस गाड्यात बिघाड झाला होता. त्यापैकी 60 बसगाड्या दुरुस्त केल्या असून 49 बसगाड्यांच्या दुरुस्तीचे काम रात्रीपर्यंत सुरू होते, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.