मुंबई - दहावीचा अभ्यासक्रम आणि मुल्यमापन पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतील. यामुळे शिक्षण विभागाने हा बदल करू नये, असा इशारा शिक्षण उत्कर्ष मंचने राज्य शिक्षण मंडळाला दिला होता. मात्र, त्याकडे मंडळाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने दहावीच्या परीक्षेचा निकाल तब्बल १२.३१ टक्क्यांनी घटल्याचे आज समोर आले. याविषयी राज्यभरात विद्यार्थी, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिक्षण उत्कर्ष मंचने २८ ऑक्टोबर २०१८ रोजी याविषयी शिक्षण मंडळाकडे मागणी करत दहावीचा अभ्यासक्रम आणि मुल्यमापन पद्धतीत यंदा बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. 'ईटीव्ही भारत'मध्ये 'दहावीच्या परीक्षेतील गुणांचे 'गणित' बिघडणार" या मथळ्याखाली २८ ऑक्टोबरला बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक भारती आणि इतर संघटनांनी याविषयी शालेय शिक्षण आणि सरकारकडे मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दहावीच्या निकालात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाला मुख्य शहरात राज्यातील विद्यार्थ्यांपुढे इतर मंडळातील विद्यार्थ्यांच्या अडचणी उभ्या टाकणार आहेत. यामुळे सरकारने आमचे ऐकले असते तर हा प्रसंग उद्भवला नसता, अशी प्रतिक्रिया शिक्षण उत्कर्ष मंचाचे प्रमुख सुधीर घागस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.