मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटके आढळून आली होती. यासंदर्भात एनआयएने निलंबित अधिकारी सचिन वाझे यास अटक केलेली आहे. यानंतर सचिन वाझेंच्या बँक अकाउंटमधून दीड कोटी रुपये मिळाले असून, इतर ठिकाणी मारलेल्या छाप्यादरम्यान आणखीन काही रक्कम मिळाली असल्याचे समोर आले आहे.
याबरोबरच सचिन वाझे पोलीस सेवेत असताना टीआरपी संदर्भात तपास करत होते. यादरम्यान त्यांनी या संदर्भातील आरोप असलेल्या बार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून 30 लाख रुपये लाच घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भात ईडीकडूनही तपास केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हवाला मार्गे 30 लाख मिळवल्याचा संशय..
टीआरपी घोटाळ्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटकडून तपास केला जात असताना, या गुन्ह्याचा तपास सचिन वाझेंकडे देण्यात आला होता. यादरम्यान बार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जात असताना, यामध्ये अटक कारवाई करण्यात येऊ नये म्हणून सचिन वाझेंनी 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. हा पैसा हवाला मार्गे वाझेंकडे पोहचविण्यात आला असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे संदर्भात ईडी कडून चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, सचिन वाझे याचा सहकारी रियाज काझी याला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने रविवारी अटक केली . त्यास 16 एप्रिलपर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा :हे तर महावसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांची मंगळवेढ्यात टीका