मुंबई - शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना आज ( 20 जुलै ) पुन्हा 27 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं ( ED Summons Sena MP Sanjay Raut ) आहे. संजय राऊत यांना बुधवारी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याकरिता समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत संसद सुरु असल्याने दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. मात्र, ईडीने त्यांची विनंती फेटाळून लावली आहे. तसेच, 27 जुलैला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या कथित घोटाळ्यात संजय राऊत यांची १ जुलै रोजीही १० तास चौकशी करण्यात आली होती. 'केंद्राची तपासयंत्रणा आहे, सहकार्य केलं, त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी दूर केल्या पाहिजेत, माझ्याकडून पूर्ण सहकार्य केलेलं आहे,' अशी प्रतिक्रिया या चौकशीनंतर राऊत यांनी दिली होती. त्यानंतर 19 जुलैला समन्स बजावत 20 जुलैला हजर राहण्यासाठी सांगितलं होते. मात्र, संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे ते हजर राहिले नाही. दरम्यान, राऊतांनी चौकशीसाठी 7 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. ईडीने सदर विनंती फेटाळून लावली. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना समन्स पाठवत 27 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं आहे.
संजय राऊतांच्या निकटवर्तीयांची चौकशी - मंगळवारी ( 19 जुलै ) ईडीने संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणात सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची चौकशी केली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे व्यवसायिक मित्र आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या नावाने संजय राऊत यांनी अलिबागमधील जमिनीची खरेदी केल्याचा आरोप आहे. तर, जमिनीचे 4 प्लॉट हे स्वप्ना पाटकर यांच्या नावे आणि 4 प्लॉट राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर या दोघांची ईडी कार्यालयात काल चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता संजय राऊत यांना ईडीने 27 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे.