मुंबई - शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. येत्या मंगळवारी (२९ डिसेंबर) वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आले आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यानंतर दुसरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
नोटीस पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देणार - संजय राऊत
दरम्यान या प्रकरणी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे व ईडीची नोटीस आल्याची कोणतीही माहिती नाही, नोटीस पाहिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल, असे सांगितले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू आहे. याच प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेले आहे.
संजय राऊत यांनी केलेले ट्विट दरम्यान संजय राऊत यांनी एक ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी 'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथियों' असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यावरून अनेक तर्क लढवले जात आहेत.
या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
खडसेंनंतर राऊत ईडीच्या निशाण्यावर -
नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी ३० डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. खडसे यांना 2016 मध्ये या जमीन व्यवहारप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, तेव्हा ते महसूलमंत्री होते. भाजपमध्ये 40 वर्षा काम केल्यानंतर खडसे नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झाले. खडसेंना 30 डिसेंबर रोजी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार वर्षा राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले. हा व्यवहार कसा झाला आणि त्यामागील कारण काय आहे, हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहितीसाठी बोलावण्यात आले आहे.
भाजप नेते किरीट सोमैया प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी नोटीसीबाबत स्पष्टीकरण द्यावे - किरीट सोमैय्या
ईडीने कोणत्या प्रकारची नोटीस बजावली आहे, याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले पाहिजे. पीएमसी बँकेसोबत त्यांचे कधी व्यवहार झाले आहेत का? या आधीही त्यांना कधी अशा प्रकारची नोटीस आली आहे का? करण पीएमसी बँकेत सध्या लाखो लोकांची रक्कम अडकली आहे. या घोटाळ्याचा तपास होऊन बँक पुन्हा सुरू झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.