मुंबई -शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी 7 वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. गेल्या नऊ तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरु होती. अखेर आता ईडीने संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. संजय राऊत तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आता मोठी माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या घरातून ईडीने रक्कम जप्त केली ( ED Seized Rs 11.50 Lakhs Unaccounted Cash Residence Of Sanjay Raut ) आहे.
संजय राऊत यांच्या घरातून ईडीने 11.50 लाख रुपये जप्त केले आहे. ईडीने छापा टाकल्यानंतर चौकशीदरम्यान ही रक्कम सापडली होती. ती ईडीने जप्त केली आहे. या रकमेबाबत संजय राऊत यांना ईडी अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
ईडी कार्यालयाकडे जाताना संजय राऊत
अटक होण्याची शक्यता -पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आलं. त्यामध्ये ईडी कार्यालयात यावे लागेल, असे सांगण्यात आलं होते. त्यानुसार संजय राऊत ईडी कार्यालयात गेले आहेत. मात्र, त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अटक केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एमएलए कोर्टात हजर करण्यात येईल. सध्या संजय राऊत यांची दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण? -ईडीने पत्राचाळ प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना अटक केली होती. ते गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार सन २०१० मध्ये करण्यात आला होता.
त्यानंतर प्रवीण राऊत यांनी एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. तसंच याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १०७४ कोटी रुपये जमवले. पण, त्याचवेळी पत्राचाळीचा मात्र एक इंचदेखील पुनर्विकास केला नाही. त्याखेरीज याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले व त्या रकमेचा गैरवापर केला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांनी या घोटाळ्यातील ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केल्याचं सांगितलं जातं. तसंच या १०० कोटींपैकी ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचा आरोप आहे.
हेही वाचा -Deepak Kesarkar : 'पत्राचाळ बाळासाहेबांची संकल्पना, त्यात हस्तक्षेप...'; केसरकरांच्या संजय राऊतांना कानपिचक्या