मुंबई - शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचा मुलगा कॅप्टन अभिजित अडसूळ आणि त्यांचे जावाई यांच्याशी संबंधित मुंबई आणि अमरावतीसह सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने आज सकाळी छापा टाकला. मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी 'ईडी'ने ही कारवाई केली आहे. दरम्यान, यावेळी आनंदराव अडसुळांची तब्बेत बिघडली असून त्यांना गोरेगावच्या लाईफ केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सिटी बॅंक घोटाळा प्रकरणी कारवाई -
आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप 'ईडी'कडे नोंदविलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. त्याआधारे 'ईडी'ने बुधवारी अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे तसेच कार्यालयांची झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे.
आनंदराव अडसूळ पाचवेळा होते खासदार -
शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे पाच वेळा खासदार होते. 2009 मध्ये आनंदराव अडसूळ हे अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014 च्या निवडणुकीतही त्यांना अमरावती मतदारसंघातून यश मिळाले होते. त्यापूर्वी सलग तीन वेळा ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत मात्र अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला.
आमदार रवी राणा यांनी केली होती तक्रार -
आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला होता. तसेच या संदर्भातील पुरावे काही दिवसांपूर्वी 'ईडी'कडे सादर केले होते. आमदार रवी राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या चौकशीची मागणी केली असता खासदार आनंदराव अडसूळ यांनी रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा हे दोघे ही नौटंकी असून यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते. मात्र, आता अडसूळ पिता-पुत्रांना ईडीची नोटीस मिळाल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण -
आनंदराव अडसूळ हे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होते, तर त्यांचे नातेवाईक हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. एक हजार कोटींचा टर्नोवर असणारी ही बँक गेल्या काही वर्षांपासून बुडीत निघाली आहे. बँकेचे हजारो सदस्य तसेच पेंशनर हे या बॅंकेचे खातेधारक होते. पण हे सारेच बुडाले आहे. ठेवीदारांनी पैसे बुडाल्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती.
2014 पासून आहे राणा आणि अडसूळ वाद -
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे स्वीय सचिव सुनील भालेराव यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत 2014 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत राणांचा पराभव झाला होता. मात्र, जात वैधतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2019 मध्ये याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी निवडणूक लढविली आणि त्या विजयीही झाल्या. तेंव्हापासून राणा दाम्पत्य आणि आनंदराव अडसूळ यांच्यात वाद सुरू आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद; जाणून घ्या 'त्या' तिन्ही कृषी कायद्यांविषयी