मुंबई -मंत्री नवाब मलिक यांचा खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावा याकरिता केलेल्या अर्जावर गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी करण्यात आली. नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर मलिक यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या खासगी डॉक्टरांच्या मार्फत उपचार करण्यात यावा. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले. याबाबत न्यायालय आज निकाल देणार आहे.
नवाब मलिक हे आर्थर रोड कारागृहात तब्येत खराब असल्याने चक्कर येऊन पडले होते. नवाब मलिक यांना आर्थर रोड कारागृहातील प्रशासनाने ताबडतोब जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून ताप आणि चक्कर येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मलिक यांना किडनीचा त्रास असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी, याकरिता नवाब मलिक यांच्यावतीने सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता.
नवाब मलिकांकडून युक्तिवाद - नवाब मलिक यांच्या खासगी रुग्णालयात उपचाराकरिता गुरुवारी झालेल्या युक्तिवादामध्ये मलिक यांच्या वकिलांनी सांगितले की, नवाब मलिक यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर लवकर उपचार करणे गरजेचे असल्यामुळे न्यायालयाने खासगी रुग्णालयात उपचाराकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी युक्तिवादाचा दरम्यान वरिष्ठ वकील हेमंत देसाई यांनी न्यायालयासमोर केली.
ईडीचा युक्तिवाद - नवाब मलिक यांच्यावतीने करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर ईडीच्यावतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी म्हटले की, नवाब मलिक यांना उपचाराकरिता जेजे रुग्णालयात दाखल करण्यात यावे, नवाब मलिक यांच्यावतीने ज्या खासगी डॉक्टरांना उपचार करायचे आहे त्या डॉक्टरांना जे जे रुग्णालयात येऊन उपचार करण्याची परवानगी द्यायला आमचा विरोध नाही, परंतु खासगी रुग्णालयात दाखल करण्यास ईडीने विरोध दर्शवला आहे. जर नवाब मलिक यांच्यावर उपचार करण्यात येणाऱ्या आरोग्यदायक सुविधा जे जे रुग्णालयात नसेल तर जे जे रुग्णालयाच्या अहवालानुसार त्यांना इतर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी नंतर न्यायालयाने द्यावी, असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने निकाल राखीव ठेवत आज (सहा मे) नवाब मलिक यांच्या संदर्भातील निकाल देणार आहेत.