मुंबई -सामनाचे संपादक शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना 4 दिवसांची ईडीची कस्टडी सुनावण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात काल सुनावणी पार पडली असून गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात राजयभरात शिवसेनेकडून आदोंलन देखील करण्यात आले. तसेच देशातील विरोधी पक्षांनी देखील या अटकेचा निषेध देखील केला जात आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी ८:३० ते ९:३० दरम्यान संजय राऊतांचे वकिल एड विक्रांत साबणे त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात येणार आहेत. आणि ९:३० नंतर ईडी अधिकारी त्यांच्या वकिलांसमोर चौकशी करणार असल्याची माहिती सुनील राऊत यांनी ईटीव्हीला दिली आहे.
ईडी आज चौकशी करणार : सुनील रावूत - पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता चार दिवसांत ईडीला संजय राऊत यांच्याविरोधात प्रबळ पुरावे गोळा करावे लागणार आहेत. संजय राऊत आठ दिवसांची रिमांड मिळावी, अशी मागणी ईडीने केली होती. तर संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे. त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे. तसेच संजय राऊत हे हार्ट पेशंट आहेत. त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली होती. संजय राऊत हे हार्ट पेशंट असल्याने रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांची चौकशी करणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले असल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ईटीव्ही भारताला सांगितले आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? -पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला.