मुंबई -केंद्रीय तपास यंत्रणांचा राज्य सरकारवर दबाव आणि भाजप नेत्यांकडून सतत होणाऱ्या कथित आरोपांमुळे शिवसेनेकडून संजय राऊत यांनी खुले आव्हान दिले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा धमकी देत शिवसेनेला धमकावले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंना शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर दिले. तुम्ही कितीही भ्रष्टाचाराचे आरोप करा, दबाव टाका, मात्र आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. रिश्ते मे हम तुम्हारे बाप है, असा घणाघात करत येत्या आठवड्यात ईडीचाच घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.
हेही वाचा -Raj Thackeray : गोरेगावमध्ये राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळले
शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत नारायण राणेंच्या आरोपांचे खंडन केले. शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते. प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना छेडले असता, लवकरच ईडीचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.
अशा धमक्यात तुम्हीच फसणार आहात?
नारायण राणेंनी कुंडल्या काढण्याच्या धमक्या देवू नयेत. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्या कुंडल्या पाहाव्या लागतील. तुम्हाला काय वाटले, तुमच्या कुंडल्या आमच्याकडे नाहीत का? हे महाराष्ट्र सरकार आहे. केंद्रात तुमचे असेल, पण इथे महाराष्ट्र सरकार असून व्यवस्थित आणि मजबूत आहे. आमच्या हातातही बरेच काही आहे. उगाच पोकळ धमक्या देऊ नका, अशा धमक्यात तुम्हीच फसणार आहात? असा इशारा संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते किरीट सोमैया यांचे नाव न घेता दिला.
ट्रकभर पुरावे घेऊन लाखो लोक जाणार
तसेच, लवकरच ईडी कार्यालयात ट्रकभर पुरावे घेऊन लाखो लोक जाणार आहोत. तेव्हा ईडीचे कार्यालय बंद झालेले असेल, असे राऊत म्हणाले. आमच्या 25 हजारांची चौकशी करताना, तुम्ही हजारो कोटी कसे लुटले, कसा भ्रष्टाचार केला, याबाबत पुढच्या आठवड्यात खुलासा करणार आहे. ज्या केंद्रीय यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवले आहे, तुमची ती साधने झाली आहेत, हे क्रिमिनल सिंडिकेट उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. तसेच, कुणाला अंगावर यायचे असेल, तर या, तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. शेवटी तुम्हाला तोंड काळं करून जावं लागेल. आता ही नौटंकी बंद करा, असे खडेबोल देखील राऊत यांनी भाजपला सुनावले.
हेही वाचा -Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : मुंबईच्या महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन