मुंबई -राज्यातील राजकीय नेते आणि त्यांचे निकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारावर आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता, ठाणे येथील आलिशान 11 सदनिका ईडीने जप्त केल्या ( Ed Attaches Properties Shridhar Patankar ) आहेत. यावरूनच भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमैयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आम्ही सगळीच प्रकरणे बाहेर काढली तर तुमची झोप उडेल' अशा शब्दांत सोमैयांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला ( Kirit Somaiya On Uddhav Thackeray ) आहे.
30 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा -प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोमैया म्हणाले की, "ईडीने काल केलेल्या छापेमारीत जवळपास तीस कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार समोर आणले आहेत. मागील वेळी मी डर्टी डझनची यादी जाहीर केली होती. पण, त्यात ठाकरे कुटुंबियांची नावे नव्हती. मात्र, आता श्रीधर पाटणकर यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात मागील दीड वर्षापासून मी पाठपुरावा करतोय. त्यांच्यावर मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांची कृपा आहे."