महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीएमसी बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमसी बँक प्रकरण

By

Published : Sep 30, 2019, 10:36 PM IST

Updated : Sep 30, 2019, 11:51 PM IST

मुंबई -पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन फिर्यादी जसबीर सिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरुन बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ ढवळे , याचिकाकर्ते वकील

मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वारीयम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा मालक राकेश वाधवा यांचा समावेश आहे.

2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पीएमसी बँकेकडून एचडीआयएलच्या ठराविक कंपन्यांची मोठी कर्जखाती बुडीत झाल्याने यामध्ये कर्जफेड होत नव्हती. ही बाब बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी आरबीआयच्या निदर्शनास न आणता जाणीवपूर्वक ही माहिती लपवली. बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करुन तो आरबीआयला सादर केला, असे पोलीस तपासात आढळून आलेले आहे. या सर्व प्रकारामुळे बँकेला तब्बल 4 हजार 355 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आढळून आलेले आहे.

मोठ्या कर्ज प्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेले एचडीआयएल कंपनीचा मालक व बँकेचे पदाधिकारी यांच्यात संगनमत होऊन हा घोटाळा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याला अनुसरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम 409, 420, 465, 466, 471 सह 120 ब नुसार गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून एका विशेष पथकाची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र बँकवर आरबीआय ने निर्बंध घालत फक्त 10 हजार रुपयांच्या वर पैसे काढता येणार आहेत. हे निर्बंध बेकायदेशीर असल्याचे सांगत निर्बंध हटवावेत, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात सोमवारी दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.

Last Updated : Sep 30, 2019, 11:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details