मुंबई - पर्यटकांचे आकर्षण असलेल्या स्वराज्य भूमी अर्थात गिरगाव चौपाटीवर येणाऱया नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे तब्बल ९० टक्के पाण्याची बचत होणार आहे. या मोबाइल टॉयलेटमधील यंत्रणा सौर उर्जेवर चालणारी असून पुढील सहा महिने हे टॉयलेट कार्यरत राहणार असल्याची माहिती, पालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे.
असे आहे पर्यावरणपूरक टॉयलेट
स्वराज्य भूमी गिरगाव चौपाटीवर आज या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. महिलांसाठी १ आणि पुरुषांसाठी १ असे एकूण २ शौचकुपे असलेले हे प्रसाधनगृह एका वाहनावर स्थित आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार हव्या त्या ठिकाणी नेऊन प्रसाधनगृह सुविधा पुरविता येते. प्रत्येक फ्लशमध्ये सुमारे सव्वा लीटर पाण्याचा उपयोग या शौचालयात होतो. त्यामुळे २०० लीटर पाण्याचा उपयोग करुन जवळपास १०० फ्लश करता येतात. सर्वसाधारण प्रसाधनगृहांमध्ये २०० लीटर पाण्यात २० फ्लश होतात. म्हणजेच प्रत्येक फ्लशमध्ये किमान १० लीटर पाणी वापरात येते. या हिशेबाने सदर निर्वात प्रसाधनगृहामध्ये तब्बल ९० टक्के पाण्याची बचत होते. या प्रसाधनगृहातील निर्वात यंत्रणा सौर उर्जेवर कार्यरत राहते. त्यामुळे ते पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे.