मुंबई -कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे, तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण 85 हजार 428 बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
दिलासादायक! कोरोनाच्या काळात 85 हजार जणांना मिळाला रोजगार - रोजगार आणि उद्योजकता विभाग
कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे, तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण 85 हजार 428 बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात 32 हजार 969 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तर जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान एकूण 1 लाख 17 हजार 843 बेरोजगारांना रोजगार मिळाला असल्याचेही ते म्हणाले. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.
सप्टेंबरमध्ये या वेबपोर्टलवर तब्बल 63 हजार 593 जणांनी नोंदणी केली. यात मुंबई विभागात 27 हजार 252, नाशिक विभागात 6 हजार 644, पुणे विभागात 11 हजार 681, औरंगाबाद विभागात 9 हजार 161, अमरावती विभागात 5 हजार 09 तर नागपूर विभागात 3 हजार 846 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली असल्याचे ते म्हणालेत. तसेच बेरोजगार तरुणांनी या वेबपोर्टवर नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.