मुंबई -पाच एप्रिलपासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक व अत्यावश्यक क्षेत्र वगळून अन्य सर्व व्यापार बंद राहिल्याने राज्यातील व्यापार क्षेत्र आर्थिक संकटात सापडले आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यापार, व्यवसाय ठप्प असल्याने महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्राला 70 हजार कोटींचा फटका बसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने दिली आहे.
राज्यात मे महिना अखेरपर्यंत लॉकडाऊन लावल्याचा सर्वाधिक फटका आर्थिक राजधानी मुंबईला बसला आहे. 60 टक्के किरकोळ व्यापारी व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी भीषण आर्थिक संकटात आहेत. प्रामुख्याने आंतरराज्य व आंतरजिल्हा वाहतुकीत मोठे अडथळे येत आहेत. या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात सध्या विविध ठिकाणी लॉकडाउनसारखी स्थिती आहे. त्यामुळे घाऊक व्यापार क्षेत्राचे 40 ते 45 हजार कोटी, तर किरकोळ व्यापार क्षेत्राचे 20 ते 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. परंतु सर्वांत मोठे लॉकडाउन महाराष्ट्रात आहे. त्यामुळे येथील किरकोळ क्षेत्राचे सुमारे चार कोटी व घाऊक क्षेत्राचे सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्राचे तब्बल 70 हजार कोटींचे नुकसान गुढीपाडवा व अक्षय्य तृतीया सणही मंदीत -
गुढीपाडवा व अक्षय तृतीया हे दोन महत्त्वाचे सण लॉकडाऊनच्या काळात व्यापाराशिवाय गेल्याने महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्राला सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक फटका बसलेला आहे. मागील लॉकडाऊनमुळे सोन्या चांदीच्या व्यापारावर 60 ते70 हजार कोटींचे नुकसान व्यापाऱ्यांना झाले आहे आणि मागील 1 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे 500 ते 700 कोटींचे नुकसान सराफा व्यापारी सहन करत आहेत. झवेरी बाजारात प्रत्येक दिवशी 200 ते 300 कोटींची उलाढाल आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी 300 ते 500 कोटीपर्यंत उलाढाल होते.
राज्यातील व्यापार क्षेत्र असंघटित व अकुशल लोकांना सर्वाधिक रोजगार पुरवत असते. राज्याच्या महसूलमध्ये व्यापार क्षेत्राचा वाटा लक्षणीयरित्या मोठा आहे. हे क्षेत्र अडचणीत आल्याने व्यापारी, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी हे प्रचंड अडचणीत सापडले असल्याने या क्षेत्राला व्यापार सुरू करण्याची परवानगी देण्याबरोबरच भरीव आर्थिक पॅकेज देण्याची मागणी राज्य सरकारकडे केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने दिली.
गेले जवळपास दीड महिना व्यवहार ठप्प -
गेले जवळपास दीड महिना संपूर्ण बंद राहिल्यामुळे, अनेक छोटे व्यापारी आर्थिकरित्या डबघाईला आले आहेत. अनेकांचे भांडवल संपुष्टात आले आहे. व्यापार क्षेत्राचे गेल्या वर्षभरातील दोन मोठ्या लॉकडाऊनमुळे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. हे क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची व सहकार्याची आवश्यकता आहे.