मुंबई -मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग उपायोजना करत आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १८१९ दिवसांवर पोहचला आहे. हा कालावधी देशातील रुग्ण दुपटीच्या कालावधीपेक्षा तीन पटीपेक्षा तर राज्यातील रुग्ण दुपटीच्या कालावधीपेक्षा सुमारे अडीच पट जास्त आहे. यामुळे कोरोना विषाणूला रोखण्यात राज्य आणि देशापेक्षा मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
देशभरात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. याच दरम्यान महाराष्ट्र राज्यात आणि मुंबईमध्येही कोरोना विषाणूचे रुग्ण आढळू लागले. मुंबईमधील कोरोनाची पहिली लाट यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान आटोक्यात आली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी ५३४ दिवस इतका होता. फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत एप्रिल मे दरम्यान रुग्ण वाढल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन ४० दिवसांवर आला होता. जूननंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढू लागला आहे. १२ ऑगस्टला मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १८१९ दिवसांवर पोहचला आहे.
मुंबई महापालिका देश आणि राज्याच्या पुढे
कोरोना विषाणूची दुसरी लाट फेब्रुवारीनंतर आली. त्यानंतर पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे पाचच महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आला आहे. सध्या मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १८१९ दिवसांवर गेला आहे. याचाच अर्थ मुंबईमधील एका रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याचा कालावधी १८१९ दिवसांचा आहे. हाच कालावधी राज्यामध्ये ७८७ दिवस इतका तर देशामध्ये ५८३ दिवस इतका आहे. यावरून मुंबई महापालिकेकडून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी योग्य आणि चांगले प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
लाखो नागरिकांना कोरोनाची लागण
मुंबईमध्ये गेल्या दीड वर्षात ७ लाख ३८ हजार ५२२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख १७ हजार १९१ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ९७५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २ हजार ९२८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १८१९ दिवसांवर पोहचला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत एकूण ८५ लाख ४३ हजार ३२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्ण आढळून येणाऱ्या २ चाळी, झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून तर ३१ इमारती सील आहेत.
'या' राबवण्यात आल्या उपाययोजना
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. पालिकेने रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या रुग्णांचा वेगाने शोध, कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी, चाचण्या, आरोग्य शिबीरे, उपचार पद्धती, सर्वेक्षण, क्वारंटाईन आदी नियमांची कडक अंमलबजावणीमुळे रुग्णांवर नियंत्रण आले.
काय आहे रुग्ण दुपटीचा कालावधी?
कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आल्यावर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण होते. यासाठी जो कालावधी लागतो त्याला रुग्ण दुपटीचा कालावधी म्हटल्या जाते. हा कालावधी कमी दिवसाचा असल्यास रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असते तर हा कालावधी जास्त दिवसांचा असल्यास रुग्णसंख्या संथगतीने वाढत असते. रुग्ण दुपटीचा कालावधी जितका जास्त तितका विषाणूचा प्रसार रोखण्यात यश आल्याचे बोलले जाते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
'प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांवर नियंत्रण'
कोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण, क्लोज कॉन्टॅक्टचा तत्काळ शोध, लॉकडाऊनमध्ये निर्बंधांची कठोर अंमलबजावणी तसेच प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांवर नियंत्रण आले आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कंबर कसली असून आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पुरेसा खाटा, ऑक्सिजन, वेंटिलेटर, लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड, नवीन कोविड सेंटरची उभारणी आदी सुविधा सज्ज केली जात असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.