मुंबई - कोपलँड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉम्प्रेसर बनवणाऱ्या कंपनीच्या नावाने बनावट कॉम्प्रेसर बनवणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. शहर पोलिसांच्या युनिट - 8 ने साकीनाका परिसरातील 90 फिट रस्त्यावर छापा टाकला. कोपलँड स्क्रोल टीम या नावाचे बनावट स्टिकर लावलेले एकूण 26 कॉम्प्रेसर पोलिसांनी जप्त केले. दुसर्या गाळ्यामध्ये छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी इमर्जन क्लायमेट टेक्नॉलॉजी कोपलँड बेस प्रॉडक्ट या नावाचे एकूण 1000 बनावट स्टिकरसह इतर मुद्देमाल सापडला.
बनावट कॉम्प्रेसर विकणाऱ्या दोघांना बेड्या... मुंबईत जमवली मोठी प्रॉपर्टी! - duplicate compressor producers
बनावट कॉम्प्रेसर तयार करून त्याची विक्री करणाऱ्या सिराजुद्दीन मोहम्मद हसन शहा (42) व शिवपूजन बरसाती यादव (44) या दोन आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर हे सर्व कॉम्प्रेसर 5000 रुपयांत विकत घेऊन त्यांची दुरुस्ती केल्याचे आरोपींनी सांगितले. याप्रकरणी दोघांची अधिक चौकशी करण्यात आल्यानंतर मोठा खुलासा झाला.
भारतीय रेल्वेत विकले होते बनावट कॉम्प्रेसर
सिराजुद्दीन मोहम्मद हसन शहा (42) व शिवपूजन बरसाती यादव (44) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांची चौकशी केल्यानंतर, कॉम्प्रेसर 5000 रुपयांत विकत घेऊन त्यांची दुरुस्ती केल्यावर जवळपास 40 हजार रुपयांना मार्केटमध्ये पुन्हा नव्याने ते विकण्यात येत असल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांनी संपूर्ण भारतात हे कॉम्प्रेसर विकले असून या बरोबरच आरोपींनी रेल्वे प्रशासनातील काही ओळखीच्या लोकांना हे विकल्याची कबुली दिली आहे. हे दोन्ही आरोपी याआधी सौदी अरेबियात नोकरीस होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी मुंबईत बनावट कॉम्प्रेसर विकून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. त्यातून मुंबईतील चार ठिकाणी मोठे गाळे घेतल्याचं देखील समोर आलंय.
भंगारातील कॉम्प्रेसर विकत घेऊन त्यातील काही पार्ट बदलून बनावट पार्ट लावण्यात येत होते. यावर नवे स्टिकर लावून पुन्हा बाजारात या कॉम्प्रेसरची विक्री करण्यात येत होती. मात्र त्यांचा दर्जा साधारण असल्यामुळे वारंवार शॉर्टसर्किट होऊन त्यातून दुर्घटना होण्याची दाट शक्यता असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.