महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी गर्दी जमवली, विरोधकांची सडकून टीका - chitra wagh news

पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहेत. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे.

Due to the crowd gathering Opposition strongly criticizes Sanjay Rathore
पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी गर्दी जमवली, विरोधकांची सडकून टीका

By

Published : Feb 23, 2021, 3:53 PM IST

मुंबई - पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहेत. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हजारो लोक संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. यासगळ्या प्रकरणाबाबत विरोधकांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

संजय राठोड हे यवतमाळ येथील आपल्या घरीच होते. आज सकाळी 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले. साधारण 80 किमी अंतरावर असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या सोबत कुटुंबीय व स्थानिक नेतेही आहेत. पोहोरादेवी येथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

शिवसेनेचे नेतेच नियम पायदळी तुडवत आहे- प्रवीण दरेकर

संजय राठोड गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता होते आणि आज अचानक ते जनतेच्या समोर येत आहे. गर्दी करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सत्तेतील लोकच कोरोनाच्या नियम पायदळी तुडवत असल्याची टिका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची “मी बेजवाबदार आहे!” मोहिम - किरीट सोमैया
कोरोना नियमाचे पालन न करता मंत्री संजय राठोड यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवली आहे. त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासंदर्भात देखील त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.
किरीट सोमैया
राज्याचे मुख्यमंत्री कुठे आहेत- आमदार अतुल भातखळकर
संजय राठोड यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत लोकांची मोठी गर्दी जमवली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 'मी जबाबदार' या मोहिमेला त्यांनी हरताळ फासला आहे. आत्ता मुख्यमंत्री कुठे गेले आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का हा प्रश्न आहे.
आमदार अतुल भातखळकर

कालपर्यंत बेपत्ता असलेले मंत्री आज समोर आले - चित्रा वाघ

काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मी राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. त्यांना संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले. आज संजय राठोड हे अवतरले आणि त्यांनी आज कोरोनाच्या नियमांचे देखील पालन न करता गर्दी जमवली आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, ही आमची मागणी असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ

काय म्हणाले संजय राठोड ?

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्यूवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी करू नका ही विनंती करतो. माझ्या समाजाचे माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक मला भेटतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. कृपया मला राँगबॉक्समध्ये उभे करू नका असेही राठोड यावेळी म्हणाले.

काय आहे प्रकरण -

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा- पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणात घाणेरडे राजकारण झाले - संजय राठोड

ABOUT THE AUTHOR

...view details