महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 28, 2021, 4:03 AM IST

ETV Bharat / city

वातावरण बदलामुळे पुढील ३० वर्षांत मुंबई पाण्याखाली - महापालिका आयुक्त

१५ महिन्यात जवळपास ३ चक्रीवादळे आली. ६ ऑगस्ट २०२० रोजी चक्रीवादळासह झालेल्या पावसात मुंबई नरिमन पॉइंट, दक्षिण मुंबईमध्ये सुमारे सोडेपाच फूट पाणी जमा झाले. प्रतितास १२० किलोमीटर वेगाचे वारे होते. तेव्हा मुंबईत जेएनपीटी, बॉम्बे स्टॉक एक्सजेंचे फार मोठे नुकसान झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.

महापालिका आयुक्त
महापालिका आयुक्त

मुंबई -वातावरणात होत असलेले बदल, विध्वंस करणारे चक्रीवादळ आणि हंगामाआधीच बरसणारा पाऊस लक्षात घेतला, तर २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली असेल, अशी भीती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्या दिवसांची वाट न पाहता आतापासूनच बचावाच्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत पालिका आयुक्तांनी व्यक्त केले आहे.

'३१ वर्षात पहिल्यांदाच असे घडले'

मुंबई महापालिका आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने वातावरण बदलाबाबत कृती आराखडा बनवला जाणार आहे. त्याबाबत वेबसाईटचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालिका आयुक्त चहल बोलत होते. यावेळी बोलताना, मी आएएस अधिकारी झाल्यापासून गेल्या ३१ वर्षांच्या काळात कधीही मुंबईसह राज्याला धोका निर्माण करणारे चक्रीवादळ झाले नव्हते. मात्र ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगडला फार नुकसान पोहोचले आणि मुंबईतही त्याचे परिणाम झाले. तेव्हा लक्षात आले की १८९१ नंतर म्हणजे १२९ वर्षांनंतर मुंबईत पहिल्यांदाच चक्रीवादळ आले. त्यानंतर मागील १५ महिन्यात जवळपास ३ चक्रीवादळे आली. ६ ऑगस्ट २०२० रोजी चक्रीवादळासह झालेल्या पावसात मुंबई नरिमन पॉइंट, दक्षिण मुंबईमध्ये सुमारे सोडेपाच फूट पाणी जमा झाले. प्रतितास १२० किलोमीटर वेगाचे वारे होते. तेव्हा मुंबईत जेएनपीटी, बॉम्बे स्टॉक एक्सजेंचे फार मोठे नुकसान झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.

'मुंबईचा ७० टक्के भाग पाण्याखाली'

१९९० पासून २०१० पर्यंत असे वाटायचे की वातावरणात बदल होत आहे. पण त्यावेळी काही उपाययोजना झाल्या नाहीत. पण आता संकट आपल्या दारावर येऊन ठेपले आहे. आताचा वातावरणातला बदल आणि पावसाचा लहरीपणा लक्षात घेतला तर २०५० मध्ये मुंबई महापालिकेच्या ए, बी, सी आणि डी या चार प्रभागांचा ७० टक्के भाग पाण्याखाली गेलेला असेल. कफ परेड, मंत्रालय, नरिमन पॉइंट हा भाग २५ टक्के पाण्याखाली गेलेला असेल. म्हणजे गायब झालेला असेल. तो धोका काही लांब नाही. तो धोका संभवू नये म्हणून आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुढची २५-३० वर्षे काही लांब नाहीत. त्यामुळे आताच आपण जागे झालो नाही, तर पुढची २५-३० वर्षे आपणाठी धोकादायक आहेत. याचे परिणाम पुढच्या पिढीला नव्हे, तर आताच्या पिढीला भोगावे लागणार आहेत, अशी भीतीही आयुक्तांनी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई वातावरण कृती आराखडा महत्त्वाचा आहे. दक्षिण आशिया खंडात मुंबई शहर हे असे एक शहर आहे की त्या शहराचा स्वतंत्र वातावरण कृती आराखडा तयार झाला आहे, असे आयुक्त म्हणाले.

'पाऊसही लहरी'

राज्यात ६ ते ७ जूनला हंगामी पाऊस सुरू होतो. मात्र यावेळी १७ मे रोजीच तौक्ते वादळाने मुंबईला झोडपले आणि २१७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाळी हंगामात महिन्याच्या सरासरीएवढा पाऊस दोन-चार दिवसातच कोसळत असल्याचे सांगून त्यांनी मे-जून-जुलै महिन्यात पडलेल्या पावसाचे उदाहरण दिले.

हेही वाचा -पंढरपूर तालुक्यात कोरोनापाठोपाठ डेंग्यू व चिकुनगुनियाच्या संसर्गात वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details