मुंबई -बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्याकडे एनसीबीकडून त्याच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ व पाहुण्यांच्या नावांची यादी मागण्यात आलेली होती. त्यानुसार त्यास याबद्दल पत्र सुद्धा एनसीबीकडून पाठवण्यात आले होते. या संदर्भात आलेल्या पत्रानुसार करण जोहरच्या वकिलांकडून एनसीबी कार्यालयांमध्ये 28 जुलै 2019 रोजी झालेल्या पार्टीमधील व्हिडिओ, पार्टीमध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सुपूर्द करण्यात आलेली आहेत. दरम्यान करण जोहर याने त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले असून 28 जुलै 2019 रोजी झालेल्या पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करण्यात आले नसल्याचे वकिलामार्फत स्पष्ट केले आहे.
करण जोहरकडून 'तो' व्हिडिओ एनसीबीला सुपूर्द.. काय आहे प्रकरण?
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव प्रोड्युसर क्षितिज प्रसाद आणि असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडा यांची एनसीबीकडून चौकशी झाली. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या अंकुश अरेंजा या आरोपीचे या दोन्ही व्यक्तींसोबत जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. एका कार्यक्रमाच्या फोटोत क्षितिज प्रसाद, अनुभव चोपडा हा अमली पदार्थ तस्करी अंकुश अरेंजा याच्यासोबत दिसला आहे.क्षितिज प्रसादच्या घरी ज्यावेळेस कुठली पार्टी व्हायची, त्या वेळेस ड्रग पेडलर अंकुश अरेंजा हासुद्धा या पार्टीमध्ये यायचा. ही पार्टी मुंबईत असेल किंवा दिल्लीत असेल प्रत्येक ठिकाणी अंकुश अरेंजा या पार्टीमध्ये सहभागी असायचा, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. क्षितिज प्रसाद व अनुभव चोपडा हे दोघेही निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांचे जवळचे सहकारी असल्याचे एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
करण जोहरच्या घरातील पार्टीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल -
काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या घरी आयोजित एका पार्टीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात ड्रग्जचा वापर झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे, बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचे सिंडिकेट हे कुठपर्यंत पसरलेले आहे आणि यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास एनसीबीच्या पथकाकडून केला जात आहे.