मुंबई - विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज (सोमवार) अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट करत 'या' ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? असा सवाल केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मलिक यांनी अमृता यांच्यासोबतची फोटोमधील व्यक्ती ही जयदीप राणा असल्याचे सांगतीले. तसेच जयदीप राणा हा ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये सध्या तुरुंगात असून या ड्रग्ज माफियासोबत फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
काय म्हणाले नवाब मलिक -
जयदीप राणा या व्यक्तीचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या सोबतचा फोटो असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. जयदीप राणा हा तुरुंगात असून त्याला ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये अटक झाल्याचे मलिक यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी अमृता यांनी नदी संवर्धनासाठीचे गाणे गायले होते. त्या गाण्यावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता यांनी अभिनय केला होता. त्यासोबतच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता, त्याचा उल्लेख करुन मलिक म्हणाले, त्या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता. जयदीप राणासोबत अमृता यांचे फोटो आहेत. हे फोटो सार्वजिनक कार्यक्रमात लोक भेटतात असा फोटो नाही. तर ते एकमेकांना ओळखत असल्याच्या खून करत काढलेला हा फोटा असल्याचा दावा मलिक यांनी केला. फडणवीस यांच्याच काळात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाल्याचेही मलिक म्हणाले. मुंबईत ड्रग्जचा गोरख धंदा वाढवण्यासाठीच वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणले गेले का? असाही प्रश्न उपस्थि होत असल्याचे मलिक म्हणाले आहेत.
अरुण हलदर यांचा व्यवहार दुर्दैवी -
आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडेंच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीवरही आक्षेप नोंदवला. एक संविधानीक पदावर असलेला व्यक्ती हा समीर वानखेडेंच्या घरी जाऊन ट्विट करतो हे दुर्दैवी मलिकांनी म्हटले. तसेच या प्रकाराची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.
'निरज गुंडे याच्याशीही देवेंद्र फडणवीसांचे संबंध' -
निरज गुंडे याच्याशीही देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. फडणवीस मुंबईत येताना निरज गुंडे याच्या घरी हजरे लावतात. निरज गुंडेला तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला परवानगी होती. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये त्याचे जाणे-येणे होते. वर्षा बंगल्यावरही जायचा. असे नवाब मलिकांनी म्हटले आहे. क्रुज ड्रग्ज प्रकरणात काशिफ खान, प्रतिक गाबा, सारख्या बड्या ड्रग्ज माफियांना सोडले गेले, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. येणाऱ्या काळात प्रतिक गाबाचेही पितळ उघड करणार असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ड्रग्जचा गोरख धंद्याला संरक्षण मिळाले होते, हा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.