मुंबई - मुंबईमधील नालेसफाईच्या कामाचे कंत्राट मंजूर करण्यात आले नव्हते. ते उशिरा मंजूर केल्याने नालेसफाईच्या कामाला उशीर होईल असा आरोप माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी कंत्राटे मंजूर केली आहेत. त्यानंतर मुंबईमधील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु करण्यात ( Drain cleaning work in Mumbai ) आली आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यंदाही कामे सुरु झाली असून पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक ३१ मे पूर्वी ही कामे पूर्ण केली ( Drain cleaning work will be completed before 31st May ) जातील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.
नाले सफाईची १६२ कोटींची कामे -मुंबईत दरवर्षी मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. यंदाच्या या कामांचा विचार करता, मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या असून त्यांचे मूल्य सुमारे ७१ कोटी रुपये आहे. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदांना मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ निविदा आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत.
२ लाख ५१ हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट -नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये शहर विभागात ३० हजार १४२ मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये ७३ हजार ४४३ मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ४८ हजार ०२५ मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे. या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे, असे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी नमूद केले.
व्हिडिओ क्लीप आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक -नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहून अधिक गाळ काढण्याचे काम दिनांक ३१ मे २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, असा प्रशासनाला विश्वास असून त्यादृष्टीने नियोजन करुन संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला सुरुवात केली आहे. गाळ काढण्याच्या कामावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त सुचनांचा समावेश केला आहे. प्रत्येक २०० मीटर अंतराच्या कामासाठी किमान ५ मिनिटे कालावधीची व्हिडिओ क्लीप आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिनही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअल टाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा -Bhai Jagtap On Pravin Darekar : प्रवीण दरेकर यांची ईडी व आयकर विभागाकडून चौकशी करावी - भाई जगताप