महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सर्वसामान्यापर्यंत लस पोहोचण्यास लागतील किमान सहा महिने'

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहचण्यासाठी अर्थात सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा काळ लागेल अशी माहिती राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिली आहे.

sanjay oak
sanjay oak

By

Published : Jan 5, 2021, 5:15 PM IST

Updated : Jan 5, 2021, 5:39 PM IST

मुंबई - मागील 10 महिन्यांपासून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटांशी लढत आहे. तर आता या लढ्याला मोठे यश लसीच्या रूपाने येताना दिसत आहे. लवकरच राज्यात लस उपलब्ध होणार असून प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. कोरोनाच्या लढ्यातील हा अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा आणि दिलासादायक टप्पा असणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांतच मुंबईसह राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल. पण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहचण्यासाठी अर्थात सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा काळ लागेल अशी माहिती राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिली आहे.

लसीकरण सुरू होत असतानाच दुसरीकडे कालच राज्यात नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता राज्याची चिंता नक्कीच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची सद्याची राज्यातील परिस्थिती, लसीकरण आणि नव्या स्ट्रेनची भीती अशा अनेक विषयांवर डॉ ओक यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना आपली मते मांडली आहेत.

प्रश्न -मार्चपासून राज्यात कोरोनाने मुंबईसह राज्यात थैमान घातले होते. आता रुग्णांची संख्या घटत असून मृत्यू कमी झाले आहेत. तेव्हा राज्यात कोरोना नियंत्रणात येतोय, असे म्हणता येईल का?

उत्तर - खरं आहे, प्रतिदिन मुंबई आणि राज्यात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुख्य म्हणजे मृत्युदर आटोक्यात आला आहे. काल मुंबईत केवळ 3 मृत्यू होते. राज्यात ही मृत्यू घटत आहेत. ही एक आशावर्धक गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी इंग्लंड आणि युरोपमध्ये मात्र हाहाकार मजला आहे. मोठ्या संख्येने रुग्ण नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना नियंत्रणात येत असला तरी या गोष्टीकडे कानाडोळा करता येणार नाही. म्हणूनच राज्य सरकारच्या माध्यमातून कडक भूमिका घेत नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. परदेशातून येणाऱ्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनची सक्ती केली. हा निर्णय अगदी योग्य ठरला. पण हा निर्णय राबवताना खूप विरोधही झाला. खूप फोन आले, की याला सोडा, त्याला सोडा. पण कुणालाही न सोडता प्रत्येकाला क्वारंटाइन केले गेले. हे धोरण अतिशय योग्य ठरले आणि यामुळेच आपण मुंबई-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवू शकलो.

प्रश्न -राज्य सरकारने, टास्क फोर्सने शून्य मृत्यू दर मिशन ठरवले होते. त्यानुसार आता मुंबईसह राज्यात मृत्यू कमी होत आहेत, याबाबत काय सांगाल?

उत्तर - कोरोनाला रोखण्यासाठी एकाचवेळी आपण अनेक महत्त्वाची पावले उचलली. त्याचा झालेला एकत्रित परिणाम आज पाहायला मिळत आहे. एक तर आपण लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्याला लोकांनी ही चांगला प्रतिसाद दिला. दुखणे अंगावर काढायचे नाही, डॉक्टरांकडे जायचे, कोरोना टेस्ट करायची या गोष्टी लोकांनी ही काटेकोरपणे केल्या. तर आपणही कोरोच्या टेस्ट वाढवल्या, टेस्ट करण्याची केंद्रे वाढवली, टेस्टच्या किमती कमी केल्या, रेमडेसीवीरसारखी औषधे उपलब्ध करून दिली. तसेच बेड वाढवले, महत्त्वाचे म्हणजे खासगी आरोग्य यंत्रणा आणि सरकारी आरोग्य यंत्रणानी हातात हात घालून कोरोनाशी एकत्रित लढा दिला. आता लसीची उपलब्धता या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यात आता कोरोना नियंत्रणात आला आहे.

प्रश्न - नवा स्ट्रेनचा शिरकाव राज्यात झाला आहे ही किती चिंतेची बाब आहे? या नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी टास्क फोर्सकडून काय सूचना करण्यात आल्या आहेत?

उत्तर - निश्चितच ही चिंताजनक बाब आहे. कारण हा विषाणू जरी जास्त घातक नसला तरी तो संसर्ग पसरवण्याच्यादृष्टीने घातक आहे. 70 टक्के वेगाने हा विषाणू पसरतो. त्यामुळे मोठ्या संख्येने एकावेळी रुग्ण वाढू शकतात. तेव्हा पुन्हा आपण ज्या अवस्थेत मार्च-एप्रिल-मेमध्ये होतो, बेडस कमी पडताहेत, अ‌ॅम्ब्युलन्स कमी पडताहेत; या अवस्थेत मला पुन्हा राज्याला जाऊ द्यायचे नाहीये. त्यामुळे विमान प्रवास आणि विमानाने येणाऱ्यावर जे निर्बंध घातले गेले आहेत. ते अधिक कडक करावेत. कुणालाही सोडू नये. जे लोक 7 व्या दिवशी निगेटिव्ह येतील त्यांना घरी पुढील 7 दिवस कडक होम क्वारंटाइनमध्ये ठेवावे, त्यांचे निरीक्षण करावे. तर जे पॉझिटिव्ह येतील त्यांची एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) कडून नव्या स्ट्रेनचा हा रुग्ण नाही ना याची तपासणी करून घ्यावी. जर तो नव्या स्ट्रेनचा रुग्ण ठरला तर त्याला 14 ते 21 दिवस (आधी 14 दिवस आणि पुढे आणखी 7 दिवस ) इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करावे. जर रुग्ण नव्या स्ट्रेनचा नसेल तर मग त्याला होम क्वारंटाइन करावे, अशा काही सूचना राज्य सरकारला आम्ही टास्क फोर्सच्या माध्यमातून केल्या आहेत.

प्रश्न -नव्या स्ट्रेनचा धोका तरुणांना अधिक असल्याचे म्हटले जात आहे, यात तथ्य आहे का? आणि या नव्या स्ट्रेनवरील उपचार पद्धती कशी आहे? ती पहिल्या कोरोनाच्या उपचारासारखीच आहे का?

उत्तर- या विषाणूची संसर्ग पसरवण्याची क्षमता अधिक म्हणजेच 70 टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे तो सर्वच वयोगटातील लोकांना याची लागण होऊ शकेल. आतापर्यंत 18 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये कोरोना कमी दिसत होता. पण नवा कोरोना मात्र या वयोगटातही वाढू शकतो. कारण तो ज्या वेगाने पसरतो त्यातून कुणी बचावत नाही. तर उपचार पद्धतीबद्दल बोलायचे झाल्यास त्यात मोठा बदल नाही. कारण पहिला आणि हा दुसरा कोरोना विषाणू एकाच कुटुंबातील आहेत. तेव्हा तीच औषधे आणि विलगीकरण हीच पद्धत असणार आहे.

प्रश्न -नवा स्ट्रेन आढळला असताना दुसरीकडे लस उपलब्ध होत आहे. लसीकरण मोहिमेच्या पूर्व तयारीला वेग मिळाला आहे. तेव्हा लस प्रत्यक्ष कधी उपलब्ध होईल आणि लस उपलब्ध होणे ही किती मोठी बाब आहे?

उत्तर -ही खूपच मोठी बाब आहे. ही आंनद आणि अभिमानाची बाब आहे. त्यातही अभिमानाची गोष्ट म्हणजे लस माझ्या देशात तयार झाली आहे. 2021च्या प्रारंभाला आत्मनिर्भरतेचा संदेश याहून वेगळ्या प्रकारे देताच आला नसता. केंद्र सरकारकडून आपल्याला लवकरच राज्य सरकारला निर्देश येतील की किती संख्येत लस महाराष्ट्राला उपलब्ध होईल. त्यात आपण टप्प्याटप्प्यात लस देणार आहोत. आधी कोरोना योद्धे, त्यानंतर 50 वयोगटाच्या पुढील व्यक्ती आणि मग ज्यांना सहव्याधी आहेत त्यांना लस टोचवली जाणार आहे. मग सर्वसामान्यांना लस उपलब्ध होईल.

प्रश्न -सर्वसामान्य नागरिकांना नेमकी कधी लस मिळेल आणि लहान मुलांना लस उपलब्ध होणार आहे का?

उत्तर - लहान मुले कोरोनापासून बचावली आहेत. कुठेही ती मोठ्या संख्येने संक्रमित झालेली नाहीत. त्यामुळे सध्या तरी लहान मुलांना लस देण्यात येणार नाही. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचण्यासाठी मात्र किमान पुढचे सहा महिने लागतील.

प्रश्न -लस घेतल्यानंतर कोरोनाची भीती दूर होईल का? पुढेही आपल्याला कोरोनाचे नियम पाळायचे आहेत का?

उत्तर - लस आपल्या एक विश्वास देईल. पण लस आपल्याला बेफिकीरीने वागण्याचा सल्ला देणार नाही. तेव्हा 2021 हे लशीच वर्ष असलं तरी ते मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनचंही असणार आहे हे मात्र नक्की. तर लस, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन हेच आपल्या आयुष्यातील पुढची परवलीचे शब्द आहेत. हे झालेच तरच आपण आधीप्रमाणे सर्व प्रकारच्या नॉन-कोविड अ‌ॅक्टिव्हिटी करू शकू.

Last Updated : Jan 5, 2021, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details