मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यात गड-किल्ले उभे करून आपल्या रयतेचे राज्य निर्माण केले. आपण आज तेच स्वराज्य म्हणून ओळखतो. परंतु, हे भाजप सरकार ते नष्ट करत असून त्याठिकाणी हॉटेल बांधण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे आपल्या स्वराज्याची ओळख नष्ट करणाऱ्या भाजपला राज्यातील जनतेनेच पिटाळावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून हे आवाहन केले आहे.
इतिहास नष्ट करणाऱ्या भाजपला जनतेने पिटवावे हेही वाचा - गड-किल्ले भाड्याने देण्यापेक्षा मंत्र्यांचे बंगले द्या - राज ठाकरे
ते म्हणाले की, सरकारला राज्यात आता काही विकायला शिल्लक राहिले नाही. म्हणून यांनी आता राज्यातील ऐतिहासिक गड किल्ले आणि त्यांचा परिसर विकायला काढला आहे. राज्यातील प्रत्येक गड-किल्ल्यांचा एक ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देशात स्वराज्याची निर्मिती करून येथील जातीव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो इतिहास आणि वारसा हा गड किल्ल्यांच्या माध्यमातून उभा आहे. तो वारसा पुसून टाकण्यासाठी गड किल्ले हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या नावाखाली ते विकायला काढले असल्याचा आरोप त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेने या राज्यात इतिहास घडवला आणि आपले स्वराज्य निर्माण केले. तो इतिहास पुसून टाकण्याचा घाट या सरकारने रचना आहे. त्यामुळे ज्यांचा महाराजांच्या रयतेशी आणि सैन्याची संबंध होता त्या सर्व रयतेने स्वराज्याचा इतिहास पुसण्याचे काम करणाऱ्या भाजपाला रयतेने पिटवावे, असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला केले.