मुंबई -राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार असून कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. या कालावधीत रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आठवडाभरात ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार, महापालिका जनजागृती करत आहे. मात्र त्यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनीही पुढाकार घेण्याची आहे. तसेच राज्यभर मुंबई मॉडेलची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तरच या मृत्यूंचे प्रमाण कमी करता येऊ शकते, असे मत डेथ ऑडिट कमिटीचे डॉ. अविनाश सुपे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना मांडले आहे.
'एनजीओंनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा'
राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३९ हजार ६८८ तर दुसऱ्या लाटेतील ६० हजार २२ मृत्यूच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये ५० टक्क्याहून अधिक मृत्यू हे रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सहा दिवसात होत असल्याचे निदर्शनास आले आहे, याबाबत डॉ. सुपे बोलत होते. अनेक रुग्ण हे रुग्णालयात वेळेवर उपचारासाठी दाखल होत नाहीत, रुग्णालयात दाखल होण्यास उशीर होत असल्याने मृत्यू होतात. हे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकार, महापालिका प्रयत्न करत आहे, जनजागृतीही केली जात आहे. नागरिकांनी जागृत व्हावे, वेळेवर उपचार करून घ्यावेत, लक्षणे आल्यास त्वरित चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन सुपे यांनी केले आहे. एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन नागरिकांनी वेळेवर चाचण्या करून उपचार करून घेण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सुपे यांनी म्हटले आहे. तसेच मुंबई मॉडेलची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. मुंबई मॉडेल हे यशस्वी ठरल्याने त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्ह्यात केल्यास रुग्णालयात दाखल केल्यावर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते, असे सुपे म्हणाले.
काय आहे विश्लेषण?
राज्याने कोरोनामुळे झालेल्या पहिल्या लाटेतील ३९, ६८८ आणि दुसऱ्या लाटेतील ६०,०२२ मृत्यूच्या डेटाचे विश्लेषण केले. पहिल्या लाटेत ३१.५ टक्के मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्याच्या १ ते ३ दिवसात आणि २२.४ टक्के मृत्यू हे ४ ते ६ दिवसात झाले. हॉस्पिटलायझेशनच्या सहाव्या दिवसादरम्यान ५३.९ टक्के मृत्यू झाले आहेत. दुसऱ्या लाटेत, तिसऱ्या दिवसापर्यंत ३०.४ टक्के लोकांचा मृत्यू झाला तर ३ ते ७ दिवसांच्या दरम्यान २३.७ टक्के रुग्णांचे मृत्यू झाले. या लाटेत, रुग्णालय प्रवेशाच्या सहा दिवसात सुमारे ५४ टक्के मृत्यू झाले. या दरम्यान मृत्यू होण्यापूर्वी रुग्णांनी मृत्यूशी ३६ ते ३९ दिवस लढा दिला आहे.
राज्यातील रुग्णसंख्या
राज्यात शुक्रवारी ३ सप्टेंबरपर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ६४३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांपैकी ११.८९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार ०९८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ५० हजार ४६६ सक्रिय रुग्ण आहेत.
काय आहे मुंबई मॉडेल?
मुंबई महापालिकेच्या कोरोना व्यवस्थापनाचे सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकारच्या नीती आयोगाने कौतुक केले आहे. दुसऱ्या लाटेत सुरुवातीला कोरोनाने कहर केल्याने मुंबईतील स्थिती बिकट झाली होती. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढल्याने पालिकेच्या आरोग्य सेवेवरही प्रचंड ताण आला होता. मुंबई महापालिकेने प्रभावी उपायोजना राबवल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. युद्ध पातळीवर ऑक्सिजन वितरण केले. बेडचे वाटप, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, शिवाय खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे हे सर्व रुग्णांना तातडीने मिळतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला आहे. वॉर रुम निर्माण करून त्याद्वारे कोरोना रुग्णांसाठी व्यवस्थापन केले आहे. तसेच मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे.