मुंबई- संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण असताना मुंबईत 93 हजार 898 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील 5 टक्के लोकांनीही प्लाझ्मा दान केलेला नाही. अशा स्थितीत माहीममधील एका डॉक्टराने रुग्णसेवा सुरू ठेवत तीनवेळा प्लाझ्मा दान केले आहे. या कोरोना योध्याचे नाव आहे, डॉ.आंजनेय आगाशे. त्यांनी प्लाझ्मा दान करून कोरोनाने मृत्यू झालेल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरते आहे. पण प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्यासाठी सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येते. एकूणच प्लाझ्मा दानाबाबत जनजागृतीचा अभाव, भीती आणि गैरसमजामुळे ही परिस्थिती आहे. असे असताना मुंबईतील डॉ आंजनेय आगाशे हे कोरोना योद्धा म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा प्लाझ्मा दान केला आहे. कोरोनामुळे वडील गमावल्यानंतर कोरोनाला हरवण्यासाठी आपण काय करू शकतो या विचारातून त्यांनी तीनदा प्लाझ्मा दान केला. त्यांनी खऱ्या अर्थाने वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची झाली होती लागण-
माहीममध्ये त्यांचा दवाखाना असून ते डोळ्यांचे डॉक्टर आहेत. मार्चपासून कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली. पण डॉ. आगाशे रुग्णसेवा देत होते. अशातच मे मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या 89 वर्षांच्या वडिलांची कोरोनाविरोधातील लढाई 24 मे ला झुंज संपली. आगाशे कुटुंब दुःखात असतानाच त्यांना आणखी एक झटका बसला. संपूर्ण आगाशे कुटुंब हे कोरोना पॉझिटिव्ह आले. डॉ. आगाशे, त्यांची आई, पत्नी, मुलगी आणि मुलगा सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून सगळे बरे झाले आहेत.
प्लाझ्मा दान करण्यासाठी कुटुंबाचा पुढाकार
वडीलांच्या वेळेस रेमडेसीवीर औषध प्लाझ्मा थेरपी उपलब्ध नव्हती. अशी उपचार पद्धती असते तर वडील नक्की वाचले असते, ही खंत त्यांना वाट होती. कोरोनाच्या महामारीला हरवण्यासाठी काय करायचे असा विचार मनात सुरू होता. त्यातून प्लाझ्मा थेरपीचा विचार पुढे आल्याची माहिती डॉ. आगाशे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. त्यानुसार संपूर्ण कुटुंबाने प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. पण आईचे वय जास्त असल्याने तर मुलगी 17 वर्षाची असल्याने त्यांना प्लाझ्मा दान करता आले नाही. तर त्यांच्या पत्नीलाही तांत्रिक कारणाने प्लाझ्मा दान करण्याच्या प्रक्रियेतून वगळण्यात आले.