मुंबई - पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे त्यांचा आनंद आम्ही समजू शकतो. मात्र, या लोकशाहीमध्ये इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे दिग्गज नेते निवडणुका हरले आहेत हे भाजपाने विसरू नये. (Congress State President Nana Patole) नाहीतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष दोन खासदारांचा पक्ष होईल असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका
भारतीय जनता पक्षाला चार राज्यांमध्ये विजय मिळाला असला तरी, त्यांनी महाराष्ट्रासाठी भारावून जाऊ नये. महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करेल. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून नेहमीच भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मांडण्यात आली आहे. मात्र, यामध्ये कधीच भाजपाला यश मिळणार नाही असेही नाना पटोले यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.